कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

Death
May 15, 2019

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – नाशिकच्या येवला तालुक्यातील खामगाव येथील २६ वर्षीय महिलेचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी दोषी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अंदरसूल प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात पंधरा महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्यात खामगाव येथील वर्षा अमोल अहिरे (वय २६) यांच्यावरही डॉ. हितेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास या महिलेला असह्य त्रास सुरू झाल्याने महिलेच्या नातेवाईकांनी परिचारिका मनीषा गायकवाड यांना याबाबत कळविल्यानंतर गायकवाड यांनी वर्षा यांना इंजेक्शन दिले. त्यानंतरही वेदना कमी होत नसल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांशी संपर्क साधला असता, त्यांना संबंधित डॉक्टरांनी व परिचरिकेने ‘तुम्ही झोपा अन् आम्हालाही झोपू द्या’, अशी अरेरावीची भाषा वापरल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. त्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास वर्षाचा मृत्यू झाल्याचे समजताच उपस्थित नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करत गोंधळ घातला आणि दोषी डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

या प्रकारामुळे आरोग्य केंद्राच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जोपर्यंत संबंधित डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन न करता नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येईल, असे सांगितल्याने नातेवाईकांनी ही मागणी मान्य केली. त्यानंतर वर्षाचा मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथील शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधिन करण्यात आला. याप्रकरणी येवला तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत तारू यांनी सांगितले की, वर्षा अहिरे यांची शस्त्रक्रियेपूर्वी तपासणी केली असता त्यांचे दोन वेळा सिझर करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर नातेवाईकांशी चर्चा करून सायंकाळी वर्षा यांच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता त्यांची तपासणी केली असता प्रकृती व्यवस्थित होती. रात्री अकरा वाजेच्या सुमारास महिलेला चक्कर येऊन त्रास होऊ लागल्याने उपचार केले. रात्री अडीच वाजता नातेवाईकांनी रुग्ण हालचाल करीत नसल्याचे सांगितले. त्यानंतर तपासणी केली असता वर्षा यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.