योग्य उपचार करून डॉक्टरांनी वाचवला वृद्धाचा हात
पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – डॉक्टरांनी केलेल्या योग्य उपचारामुळे मुंबईतील एका ६३ वर्षांच्या व्यक्तीचा हात वाचला आहे. अचानक त्यांचा उजवा हात काळा-निळा पडू लागला. यानंतर कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले. येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी कलर डॉपलर आणि अँजिओग्राफी या वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या. या चाचण्यांमधून समजले की त्यांच्या हाताला रक्तपुरवठा करणाऱ्या एका रक्तवाहिनीचं काम मंदावलं आहे. यामुळे रक्तवाहिन्यांच्या गुठळ्या होऊन उजवा हात निकामी होऊ लागला होता.
आपला हात वाचल्याने या रूग्णाने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. हात अचानक काळेनिळे पडू लागल्यानं तातडीनं डॉक्टरांना दाखवलं. वैद्यकीय चाचणीत हात निकामी होऊ लागल्याचं कळताच कुटुंब चिंतेत होतं. मात्र डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून हात वाचवला. वेळीच निदान आणि उपचार केल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानतो, असे या रूग्णाने म्हटले.
या रूग्णाचा हात वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीनं शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं. यानंतर वोक्हार्ट रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. रवी गुप्ता यांच्या नेतृत्वात ही शस्त्रक्रिया पार पडली आणि या व्यक्तीचा हात वाचला. तळहाताला रक्तपुरवठा व्हावा याकरता हार्ड वायर आणि बलूनच्या सहाय्याने ही रक्तवाहिनी खुली करण्यात आली. या प्रक्रियेत निकामी झालेला हात वाचवण्यासह त्यांच्या नियमित डायलिसिससाठी एव्ही फिस्टुला वाचवणंही आवश्यक होतं. हाताच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होणं हा आजार आहे. यात रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्यानं ऑक्सिजनयुक्त रक्त हातापर्यंत पोहोचत नाहीत.
हा आजार बळावल्यास त्वचा काळीनिळी पडू लागते. वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास हात कापावा लागू शकतो. याशिवाय हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. पायांच्या रक्तवाहिन्यांच्या विकारांच्या तुलनेत हातांच्या रक्तवाहिन्यांचा विकार खूप कमी प्रमाणात आढळून येतो. बऱ्याचदा रुग्णांना याबद्दल पुरेशी माहिती नसते. त्यामुळे हाताचा वापर करताना वेदना जाणवल्यास, अशक्तपणा वाटल्यास किंवा हात काळेनिळे झाले असतील तर दुर्लक्ष न करता तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे येथील डॉक्टरांनी सांगितले.