किमोथेरपी म्हणजे काय ? ती कर्करुग्णांसाठी वरदान ठरते का ?
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शस्त्रक्रिया,रसायनोपचार म्हणजेच किमोथेरपी आणि किरणोपचार म्हणजे रेडिएशन या कर्करोगाच्या तीन उपचारपद्धती आहेत. यातील किमोथेरपी हा प्रमुख उपचार असून कधी शस्त्रक्रियेपूर्वी तर कधी शस्त्रक्रियेनंतर हा उपचार रूग्णावर केला जातो. किमो हा कधी, कोणता व किती द्यायचा ते मात्र डॉक्टर ठरवितात. किमोथेरपीतून कर्करोग पेशींची वाढ खुंटते. परंतु, हे करताना चांगल्या पेशींवर तात्पुरते साइड इफेक्ट होतात. परंतु कर्करोग आटोक्यात राहण्यासाठी आणि कालांतराने निरोगी होण्यासाठी किमोथेरपी महत्त्वाची ठरते.
कधी शस्त्रक्रियेपूर्वी कर्करोगाची गाठ आकुंचित करण्यासाठी किमो दिले जातात. शस्त्रक्रिया किंवा किरणोपचारानंतर तर कधी कर्करोग पुन्हा उद्भवू नये म्हणून किमो दिले जातात. किरणोपचारांबरोबर परिणाम वाढविण्यासाठीही किमो दिले जातात. रसायनोपचार वा किमोथेरपी ही वेगवेगळ्या पद्धतीनेही दिली जाते.शिरेवाटे इंजेक्शनद्वारा, तोंडावाटे कॅप्सुलच्या स्वरुपात यकृत, जठर, अंडाशय अशा अवयवांमध्ये रोपण करून अथवा स्रायूंमध्ये किंवा त्वचेखाली इंजेक्शनने दिली जाते. बहुतेक वेळा किमो ही हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात अथवा रसायनोपचाराच्या विशेष दिवस कक्षात दिले जातात. शरीराच्या ज्या पेशींचा व अवयवांचा वापर जास्त असतो व जेथे सतत पेशींचे पुनर्निमाण होत असते. त्या भागांवर रसायनोपचाराचा सर्वात अधिक परिणाम दिसतो. तोंडाचे आतील अस्तर, जठर वा पचनसंस्थेचे आतील अस्तर त्वचा, केस आणि अस्थिमज्जा जिथे नव्या रक्तपेशी तयार होत असतात.
किमोथेरपीनंतर होणारे त्रास
पचनसंस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
अन्नाची चव बदलू शकते.
अन्न बेचव लागते किंवा ते जास्त खारट, कडवट लागते.
तोंडात आतून लहान फोड येऊन ते लाल होतात.
मळमळ-ओकारीसारखे वाटू लागते.
अतिसार वा बद्धकोष्ठताही होऊ शकते .
केस गळण्याची बरीच जास्त शक्यता असते.
काय करावे
तोंडाची चव गेल्यास थंड व गोड पदार्थ खावेत.
अननस खाल्यास तोंड आतून स्वच्छ राहते.
मळमळ कमी करण्यासाठी आले-लिंबू रस,पुदिनायुक्त पेय घ्यावे.
पोटाचे विकार टाळण्यासाठी ताजे, तंतूमय सकस अन्न, ताजी फळे खाण्याबरोबर हलका व्यायाम करावा.