आज देशभरातील निवासी डॉक्टर संपावर
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कोलकातामधील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाणीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या घटनेचे संतप्त पडसाद घटनेनंतर सर्वत्र उमटत आहेत. या मारहाणीच्या निषेधार्थ आज देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटना, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र या संघटनांनी हा संप केला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग, अन्य विभाग आणि शैक्षणिक दिनक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतला आहे. संप असला तरी आपत्कालीन रुग्णसेवा सुरू असणार आहे.
सरकार जागतिक स्तरावर आरोग्य योजना बनवण्यात आहे. पण, कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना सुरक्षित वातावरण देण्याकडे सरकारचे लक्ष नाही. आम्ही कायदा हातात घेण्याची वाट सरकार पहात आहे, असा आरोप मार्डने केला आहे. सुरक्षेसाठी सरकारला वारंवार पत्र लिहून आणि विनंती करून काहीही उपयोग होत नाही. आता आमचा संयम संपला असून आता कोणतीही पूर्वसूचना न देता कृती केली जाईल, असा इशारा मार्डच्या डॉक्टरांनी परिपत्रकात दिला आहे. देशातील सर्व राज्यांच्या सरकारने राज्यातील रुग्णालयांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देशपातळीवर सर्व डॉक्टर काळ्या फिती बांधून काम करणार आहेत. संघटनेच्या जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये धरणे आंदोलन करून निषेध करण्याचे आवाहन आयएमएने दिले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने सातत्याने डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय कायदा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित शासकीय विभागांना पत्र पाठविण्याचे आवाहनही असोसिएशनच्या वतीने केल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयएमएने दिली आहे.