जास्त झोपायची सवय असल्यास बंद करा, अन्यथा होतील ‘हे’ तोटे

Sleep

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – माणसाला झोप खूप जरूरी आहे. रात्री लवकर झोपून सकाळी सुर्योदयापूर्वी लवकर उठले पाहिजे. अनेकजण जागरण करतात आणि सकाळी उशीरा उठतात. तर काहीजण लवकर झोपूनही सकाळी उशीरापर्यंत झोपून राहतात . झोप ही खूप महत्वाची आहे. ज्यावेळी झोप लागत नाही अथवा जागरण करावे लागते तेव्हा झोपेचे महत्व समजते. सर्वसाधारणपणे आपण आयुष्याचा एक तृतियांश भाग झोपेत घालवतो. झोपेविषयी अनेक गैरसमज आहेत. जास्त झोप ही आरोग्यासाठी चांगली नसते.

तुम्हाला हे माहित आहे की, झोप ही सुद्धा जागेपणा सारखीच अवस्था आहे. त्यात मेंदूचा काही भाग अतिशय कार्यरत असतो. मेंदूचे ऐकणे, बोलणे, दिसणे हे काम करणारे भाग शांत असतात. पण, मोठ्या मेंदूचा समोरील भाग दीडपट जोरात काम करत असतो. मात्र, याची जाणीव आपल्याला नसते. यातूनच नंतर मेंदूच्या इतर भागांना सूचना जातात.

दिवसा झोपणे हे त्रासदायक ठरू शकते. यामुळे आपली कार्यक्षमता कमी होते. जास्त अथवा सतत कमी झोप ही बऱ्याच शारीरिक व्याधी म्हणजे ब्लड प्रेशर, डायबेटिस, स्थूलपणा यांना आमंत्रण देते. वृद्धव्यक्तींसह सर्वांना सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. मात्र, वय झाल्यानंतर सलग मात्र झोप लागत नाही. मधून मधून जाग येते.

झोपेचे चक्र नीट, संतुलित राहण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती, स्वच्छ जागा, शांतता, अंधार असावा. झोपेच्या अगोदर टीव्ही बघणे, मोबाइल बघणे , लॅपटॉपवर काम करणे अर्धा तास अगोदर तरी बंद करावे.