मुंबई : आरोग्यनामा ऑनलाईन – समाजामध्ये आजही अनेक कुप्रथांचा सुळसुळाट आहे. त्यातील एक महत्वाची कुप्रथा म्हणजे व्हर्जिनिटी टेस्ट म्हणजेच कौमार्य चाचणी. व्हर्जिनिटी टेस्ट आता राज्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळण्याचा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं घेतला आहे. विशेष म्हणजे असा निर्णय घेणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. डॉ. इंद्रजित खांडेकर यांच्या तब्बल नऊ वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे.
कुठल्याही व्यक्तीला दुसरी व्यक्ती व्हर्जिन आहे किंवा नाही हे तपासून पाहण्याचा मुळीच अधिकार नसतो तसेच वैद्यकशास्त्रात कुठलंही संशोधन नसताना अनेक वर्षांपासून याचा अभ्यासक्रमात समावेश आहे असं असतानाही वैद्यकीय अभ्यासक्रमात व्हर्जिनिटी टेस्ट समाविष्ट होती. या पार्श्वभूमीवर वर्ध्याच्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर इंद्रजित खांडेकर यांनी केंद्र सरकार, भारतीय वैद्यक परिषद, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडं अहवाल पाठविला होता आणि कौमार्य चाचणीचा धडा अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी केली होती. कौमार्य चाचणीस कुठलाही वैद्यकीय आणि वैज्ञानिक आधार नसल्याचं त्यांनी प्रस्तावात नमूद केलं होतं. या अहवालानुसार कौमार्य चाचणी अवैज्ञानिक तसेच अशास्त्रीय असल्याचा मुद्दा मान्य करीत अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय अभ्यास मंडळाच्या वतीनं घेण्यात आला. त्यामुळे लवकरच राज्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातून या चाचणीचा भाग वगळला जाणार आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमात अनेक पुस्तके ही महिलांच्या कौमार्य चाचणी करण्याबाबत सांगतात. पण, पुरुषांच्या कौमार्य चाचणीबाबत एखाद्या पुस्तकातून क्वचितच भाष्य करण्यात आले असेल. ही चाचणी पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. व्हर्जिनिटी टेस्ट’ (two-finger virginity test) म्हणजेच कौमार्य चाचणी ही पूर्णपणे अवैज्ञानिक असल्याचे जगभरातील तज्ज्ञांनी मान्य केले आहे.