असुरक्षित शारीरीक संबंधांतून वाढतो ह्यूमन पेपिलोमा व्हायरसचा धोका
आरोग्यनामा ऑनलाईन – ह्यूमन पेपिलोमा व्हायरस हा एचपीव्ही म्हणून ओळखला जात असून तो अतिशय घातक आहे. ह्यूमन पेपिलोमा व्हायरस सेक्स आणि ओरल सेक्समुळे एकमेकांमध्ये पसरतो. हा व्हायरस अत्यंत वेगाने शरीरात पोहोचतो आणि त्यानंतर शरीरामध्ये काही विशेष लक्षणही दिसून येत नसल्याने लागण झाल्याचे समजत नाही. ज्या व्यक्ती अधिक मद्यसेवन करतात, वाढत्या वयातील पुरूष, एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत शारीरिक संबंध, रोगप्रतिकार शक्ती कमी असणे, अशांना या व्हायरसचा धोका अधिक असतो. शाारीरीक संबंध ठेवणाऱ्या कमीत कमी ८० टक्के महिला आणि पुरूषांना या व्हायरसची लागण होण्याची शक्यता असते. यासाठी एचपीव्हीची होणारी लागण आणि त्यापासून कसा बचाव करावा याची माहिती असणे आवश्यक आहे. एचपीव्हीच्या संसर्गावर कोणताही ठोस उपाय नसला तरी लक्षणे आढळून आल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येते. हा संसर्ग टाळण्यासाठी एकापेक्षा जास्त लोकांशी शारीरिक संबंध ठेवू नये. यामुळे एचपीव्हीच्या संसर्गाचा धोका खूपच कमी होतो.
एचपीवी संसर्ग झाल्यानंतर महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचीही शक्यता वाढते. जर गर्भाशयामध्ये काही असामान्य पेशींची निर्मिती होत असेल तर त्यावर वेळीच उपचार करता येऊ शकतात. महिलांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काही तपासण्या करून घेणे आवश्यक असते. गर्भाशयाच्या कॅन्सरची सर्वाधिक प्रकरणे एचपीव्हीशी संबंधीत असतात. एचपीव्हीच्या व्हायरसचे संक्रमण फारसे नुकसान नसून कालांतराने या व्हायरसचा प्रभाव नष्ट होतो. जर गुप्तांगामध्ये गाठी झाल्या तर त्यावर औषधोपचार करून ते बरे करता येऊ शकते. मात्र, या संसर्गामुळे शरीरामध्ये इतर कॅन्सर होण्याचादेखील धोका वाढतो. यामध्ये गळ्याचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर आणि पुरूषांच्या गुप्तांगाच्या कॅन्सरचा समावेश असतो, असे आढळून आले आहे. या व्हायरचा संसंर्ग झाल्याचे वेळीच समजले नाही तर कॅन्सर होऊ शकतो. तरूणांसाठी या व्हायरसपासून बचाव करून घेण्यासाठी लस उपलब्ध आहे.