‘हे’ आहेत शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याचे संकेत
आरोग्यानामा ऑनलाइन टीम – काही कारणास्तव शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास अनेक आजारांना निमत्रण मिळते. असे कमकुवत शरीर आजारांना लवकर बळी पडते. यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नेहमी चांगली राहिल याची काळजी घेतली पाहिजे. शिवाय प्रतिकारशक्ती कमी का होत आहे, याची कारणे आपण शोधली पाहिजेत. तरच, त्यावर उपाय करणे शक्य आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास शरीर त्याचे संकेत देत असते. परंतु, हे संकत न समजल्याने अथवा दुर्लक्ष केल्याने अडचणी, त्रास वाढत जातो. मुळात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते हे आधी जाणून घेतले पाहिजे.
तुम्ही जर सतत तणावाखाली वावरत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. कार्यालयातील कामाचा दबाव, कामाचा लोड तसेच अशी स्थिती असताना सर्दी-खोकल्यासारखा त्रास झाल्यास तुमची तणाव आणखी वाढू शकतो. जास्त वेळेपर्यंत ताण घेतल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. त्यामुळेच संसर्ग होण्याची शक्यताही अनेक पटींनी वाढते,असे अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनने एका अहवालात म्हटले आहे. याशिवाय जर तुमच्या शरीराला आवश्यक तेवढे पाणी मिळत नसेल तर हा त्रास वाढू शकतो. कारण विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी शरीराला भरपूर पाण्याची गरज असते. लघवीचा रंग पिवळा असेल तर तुम्ही भरपूर पाणी पीत नाही, हे ओळखता येते. चहा आणि कॉफीचे अधिक सेवन केल्यानेही शरीर डिहायड्रेट होते.
नाक वाहणे थोडेसे त्रासदायक असले तरी यामुळे थंडी किंवा तापापासून संरक्षण होते. म्युकस म्हणजे कफ किंवा बलगम यामुळे बाह्य व्हायरस शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. आणि जर नसल पॅसेज म्हणजेच नाकातील मार्ग खूप कोरडा असेल तर हानिकारक बॅक्टेरिया सहजपणे शरीरात प्रवेश करतात. यामुळे इरिटेशनही होऊ शकते. जर दीर्घ काळापर्यंत कोरडेपणा राहत असेल तर याकडे कधीही करू नका. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. तसेच वजन अनियंत्रित होत असेल म्हणजेच चरबी वाढत असेल तर हे हृदय, मेंदू आणि शरीराच्या इतर अवयवांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. त्याचबरोबर यामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही कमकुवत होते. तज्ज्ञांच्या मते वजन वाढल्याने हार्मोन्सवर त्याचा परिणाम जाणवतो आणि बाह्य संसर्गाशी लढण्याची शारीरिक क्षमता कमकुवत व्हायला लागते.
दातांचे विकार जास्त काळ असल्यास त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. गोड खाद्यपदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करणे दातांसाठी हानिकारक असते. १०० ग्रॅम साखरेचे सेवन केले तरी यामुळे शरीराच्या पांढऱ्या रक्तपेशींचे नुकसान होते. ही प्रक्रिया पाच तासांच्या आत सुरू होते. त्यामुळे गोड पदार्थ जास्त खावू नयेत, असे अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन्सच्या संशोधनात म्हटले आहे. तसेच खूप हसले पाहिजे यामुळे प्रतिकारशक्ती बळकट होते.
अशी घ्या काळजी
* बागेत कीटकनाशकांचा वापर करू नका
* वायुप्रदूषण, सिगारेटच्या धुरापासून दूर रहा
* धूम्रपान करू नका
* डायटिंग करण्याची चूक करू नका, यामुळे शरीराला संरक्षण देणाऱ्या पेशींचे नुकसान होते.