आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ओठ सुंदर असतील तर सौंदर्य अधिक खुलते. मात्र, ओठ काळे असल्यास सौंदर्यात बाधा आल्यासारखे वाटते. म्हणूनच ओठांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. काही लोकांचे ओठ हे नैसर्गिकरीत्या काळे असू शकतात. तसेच ओठ सतत फाटतात किंवा ओठांना चीर पडण्याची समस्याही असू शकते.तसेच सौंदर्य प्रसाधनांचा जास्त वापर केल्यानेही ओठांचे सौंदर्य कमी होते.
ओठांचा कोरडेपणा घालवण्यासाठी दुधाच्या साईत हळद मिसळून ओठांवर हळूवारपणे मालिश करावे. ओठ फाटत असल्यास मोहरीचे तेल किंचित गरम करून रात्री झोपताना नाभीवर लावावे. हा आयुर्वेदिक उपाय अतिशय चमत्कारी आहे. १२ तासात याचा चांगला परिणाम दिसून येतो. गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून त्यामध्ये सायीचे दुध मिसळावे आणि ओठांवर लावावे, हा उपाय केल्यास ओठांचे सौंदर्य खुलून येते.
ओठांचे सौंदर्य जपण्यासाठी दिवसातून दोन वेळेस ओठांवर नियमित ग्लिसरीन लावावे. तसेच दही, लोणी यात केसर मिसळून ओठांना लावल्याने ओठ हळू हळू गुलाबी होतात. विलायची बारीक कुटून लोण्यासोबत दिवसातून दोन वेळेस ओठांवर लावावी. हा उपाय सात दिवस केल्यास चांगला परिणाम दिसून येतो. तसेच ओठांचे पापुद्रे निघणे, चीर पडणे, असे होत असेल तर रात्री झोपताना ओठांना बदाम तेल लावावे. झोपताना ओठांना खोबरेल तेल लावल्यास ओठ कोमल राहतात.