आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जोपर्यंत कोणताही आजार होत नाही, तोपर्यंत प्रत्येकाला वाटते की आपण निरोगी आहोत. म्हणजेच कोणताही आजार झाल्यानंतर निरोगीपणा हा आपला भ्रम होता हे समजते. व्यक्ती निरोगी आहे की नाही हे समजून घेणे कठीण आहे. केवळ धडधाकट असल्याचा दिखावा करणे म्हणजे निरोगीपणा नव्हे. निरोगी आरोग्याचे काही मापदंड असून या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. हे मापदंड तुम्हाला किती लागू पडतात, यावरून ठरू शकते की तुम्ही निरोगी आहात अथवा नाही.
हे आहेत निरोगीपणाचे मापदंड
* एका निरोगी व्यक्तीमध्ये थंडी आणि गरमी सहन करण्याची योग्य ती क्षमता असते.
* निरोगी व्यक्तीला सकाळी कोणतेही प्रयत्न न करता साफ शौच होते. हे सुद्धा चांगल्या आरोग्याचे एक लक्षण आहे.
* शारीरिक श्रम केल्यानंतर निरोगी व्यक्तीला खूप जास्त प्रमाणात थकवा जाणवत नाही. सामान्य थकव्यानंतर त्यामध्ये पुन्हा उर्जा, उत्साह निर्माण होतो.
* निरोगी व्यक्तीला सकाळी आणि रात्री चांगली भूक लागते. वयानुसार पूर्ण आहार सेवन केला जातो. असे होत नसेल तर निरोगीपणावर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ शकते.
* झोप हे उत्तम आरोग्याचे लक्षण असून अंथरुणावर पडल्यानंतर लगेच गाढ झोप लागणे, हा चांगला संकेत आहे. अशाप्रकारे झोप लागत नसेल आरोग्यात काहीतरी गडबड असू शकते.
* सकाळी उठल्यानंतर निरोगी व्यक्तीला उत्साह आणि स्फूर्तीचा अनुभव येतो. झोप झाल्यानंतरही एखाद्या व्यक्तीला थकवा जाणवत असेल तर त्याने उपचार घेण्याची गरज असू शकते.