आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आईचे दूधचं नवजात बालकासाठी परिपू्र्ण आहार आहे असे म्हटले जाते. त्यामुळे बाळाचा जन्म झाल्यानंतर अर्ध्या तासात त्याला स्तनपान करणे गरजेचे असते. जन्मानंतर मूल पहिला एक तास जागे असते नंतर मात्र ते झोपी जाते. त्यामुळे अर्ध्या तासात बाळाला स्तनपान करणे गरजेचे आहे. जर बाळ सिझेरियन असेल तर आईची भूल उतरल्यानंतर म्हणजे चार तासांनी आईने बाळाला अंगावर पाजयला हवे. यामुळे गर्भाशय मूळ आकारात यायलाही मदत होते.
जन्माच्या अर्ध्या तासातील स्तनपान म्हणजे बाळाचे लसीकरण
आईच्या दुधात पहिले तीन ते सहा दिवस चीक असतो. त्याचा रंग लिंबाच्या रंगासारखा पिवळसर हिरवा असतो. या चीकात रोगप्रतिबंधक शक्ती असते. त्यामुळे बाळाचे अनेक रोगांपासून संरक्षण होण्यास मदत होते. यात जुलाब, सर्दी, खोकला, कान फुटणे, पोलिओ अशा रोगांचा समावेश आहे. बाळाच्या पोटातील काळी घाण साफ होऊन त्याला शौचास साफ होते. याचा फायदा असाही होतो की, बाळाच्या आतड्यात पाचकरस तयार होण्यास मदत होते.
हे आहेत आईच्या दुधाचे फायदे
आईच्या दुधाची तुलना इतर कोणत्याही दुधाशी होऊ शकत नाही. कारण आईचे दूध पचायला हलके असते. बाळाच्या वाढीस ज्या पोषक घटकांची आवश्यकता असते ते सर्व योग्य प्रमाणात त्यात असतात. स्तनपानामुळे आई आणि मुलात शारीरिक आणि भावनिक नाते निर्माण होते. आईचे दूध निर्जंतुक असते. यात प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्त्वे, क्षार आणि रोगप्रतिबंधक घटक असतात. आईच्या दुधाचे तापमान बाळासाठी योग्य असते. स्तनपानाचा आईला असा फायदा होतो की, दूध तयार होण्यास मदत होते. त्यामुळे रोज स्वच्छ अंघोळ करून बाळाला स्तनपान वेळेवर देणे गरजेचे आहे.