सिझोफ्रेनियाची लक्षणे आढळल्यास करू नका दुर्लक्ष
आरोग्यनामा ऑनलाइन – जगभरात १ टक्के लोकांमध्ये सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार आढळतो असे डब्ल्यूएचओचा अहवाल सांगतो. हा मानसिक आजार जगभरात वेगाने वाढत आहे. या आजाराने पीडित लोक समाज आणि परिवारापासून दूर राहतात. एकटे राहणे त्यांना आवडते. ही समस्या नंतर अधिक गंभीर होत जाते. या आजारावर उपचार केल्यास तो बरा होऊ शकतो. यासाठी त्याची लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे.
सिझोफ्रेनियासारखा मानसिक विकार झालेला माणूस घाबरलेला असतो. तो दैनंदिन कामे योग्यपप्रकारे करू शकत नाही. शिवाय जगण्याचा आनंदही हे रूग्ण घेऊ शकत नाहीत.
या आजाराची अनेक लक्षणे आहेत. त्यापैकी काही प्रमुख लक्षणे आपण जाणून घेऊ. यातील पाहिले लक्षण म्हणजे भ्रम होय. सिझोफ्रेनिया झालेली व्यक्तीचा मेंदू एका वेगळ्या भ्रमात असतो. ते एका काल्पनिक दुनियेत रमतात. या काल्पनिक जगात त्यांना वेगवेगळी चित्र दिसू लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे आवाजे ऐकू येतात. या आजाराचे दुसरे लक्षण म्हणजे दुसऱ्यांवर संशय येणे. सिझोफ्रेनियाने पीडित व्यक्ती अन्य व्यक्तींवर संशय घेऊ लागते. प्रत्येकजण आपल्या विरोधात काहीतरी कट रचत असे या व्यक्तींना वाटते. हे लोक कुणावर विश्वास ठेवण्यास तयार नसतात. हे रूग्ण नेहमी कन्फ्यूज असतात. काय बोलावे, काय उत्तर द्यावे, याबाबत ते जास्त विचार करतात.
पीडित व्यक्तीचे कोणत्याही एका कामात लक्ष लागत नाही. मग ते टीव्ही बघत असो वा आणखी काही. ते एका जागेवर फार जास्त वेळ टिकत नाहीत. ऑफिस, शाळा, कॉलेज कुठेही ते एकाग्र होऊ शकत नाहीत. जे लोक याप्रकारच्या मानसिक विकाराने पीडित असतात, त्यांना कोणत्याही विषयावर विचार करण्यात फार अडचण येते. ते कोणत्याही गोष्टीवर त्यांचे मत व्यक्त करू शकत नाहीत. ते काही विचार करतही असतील, तरी त्यांना काही तर्क नसतो. अशावेळी त्या व्यक्तीच्या मनातील भावना व्यक्त होत नाहीत आणि ते भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. हा आजार स्त्री आणि पुरूष दोघांनाही होऊ शकतो. पुरूषांमध्ये याप्रकारचा विकार लवकर होतो आणि महिलांमध्ये हा आजार वयानुसार होतो. १६ ते ३० वयोगटातील लोकांमध्ये हा आजार अधिक दिसून येतो. लहान मुलांमध्ये आणि ४५ वयानंतर हा आजार होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.