आरोग्यनामा ऑनलाईन टीम- सुट्टीच्या आदल्या रात्री आपल्याला छान झोप लागते. दुसऱ्या दिवशी कामाला जायची घाई नसल्याचे समाधानच शांत झोपेसाठी पुरेसे ठरते. मात्र, रविवारच्या रात्री अनेकांना झोप येत नाही. एखाद्या रविवारी झोप आली नाही तर फार काळजी करण्याचे कारण नाही. पण ही दर रविवारचीच कथा असेल तर हा संडे नाईट इन्सोम्निया म्हणजे रविवार रात्रीचा निद्रानाश आहे, असे म्हणावे लागेल. एका सर्वेक्षणानुसार जगातल्या चारपैकी एका माणसाला ही समस्या असते. इतकेच नाही, तर ६० टक्के कर्मचाऱ्यांना रविवारी रात्री कमी झोप येत असल्याची बाबही एका संशोधनातून समोर आली आहे. या संशोधनात सहभागी झालेल्या ८० टक्के लोकांना शुक्रवारी शांत झोप लागते.
रविवारी रात्री झोप न लागण्याचे कारण म्हणजे सुट्टीच्या दिवसांमधली आपली दिनचर्या. सोमवार ते शुक्रवार आपली दिनचर्या वेगळी असते आणि सुट्टी असली की आपण निवांत असतो. सुट्टीच्या दिवशी अनेकजण सकाळी उशिरा उठतात. दुपारची झोप घेतली जाते. शारीरिक श्रमही तुलनेने कमी असतात. या सगळ्यामुळे रविवारच्या रात्रीच्या झोपेवर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ताण हे रविवारी रात्री झोप न येण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. नव्या आठवड्याच्या कामाचा ताण मारक ठरतो. कामाचे विचार मनात येत असल्याने शांत झोप लागत नाही.
रविवारी शांत झोप लागावी, यासाठी सुट्टीच्या दिवशीही लवकर उठा. व्यायाम टाळू नका. पचायला जड अन्न खाऊ नका. ताणामुळे झोप येत नसेल तर रात्री गाणी ऐका किंवा पुस्तक वाचा. आपल्या काळजीचे कारण कागदावर लिहून काढा. त्यावरच्या उपाययोजनांचा आढावा घ्या. यामुळे तुमचा ताण कमी व्हायला मदत होईल.