आरोग्यनामा ऑनलाईन – पालिका रुग्णालयातील डॉक्टरांचे निवृत्ती वय ६० वरून ७० करावे असा ठराव शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी मुंबई महापालिकेकडे मांडला असून यास सूचनेला मंजुरी मिळाल्यास तो प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मुंबई महापलिकेच्या रूग्णालयातील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६० वरून ७० होणार आहे. केईएम, नायर, शीव आणि कुपर ही मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये आहेत. तर १६ उपनगरीय रुग्णालये असून या रुग्णालयांमध्ये हृदयविकार, मूत्रपिंड विकार, मज्जातंतू विभाग आणि कर्करोग आदी विभाग आहेत. या विभागातील तज्ज्ञ डॉक्टर निवृत्तीनंतर खासगी रुग्णालयात सेवा देतात. त्यामुळे गरीब रुग्णांना त्यांची सेवा मिळत नाही. त्यामुळे त्यांचे निवृत्ती वय वाढवण्याची मागणी केली जात आहे.
मुंबई महापालिका रुग्णालयात अनेक तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत असून या डॉक्टरांमुळे रुग्णांवर उत्तम उपचार होतात. मात्र हे डॉक्टर निवृत्तीनंतर खासगी रुग्णालयात सेवा देतात. पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्यास अनेक जण खासगी रुग्णालयाची वाट धरतात, मात्र त्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे डॉक्टरांच्या ज्ञानाचा अधिक फायदा पालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना झाला झाला पाहिजे, हा या मागणी मागील हेतू आहे. मुळात सर्व डॉक्टर हे वयाच्या ७० वर्षांपर्यंत अतिशय फिट असतात आणि रुग्णांना सेवा देऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांचे निवृत्ती वय ७० करण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक पडवळ यांनी केली आहे. एम्स रुग्णालयांच्या धर्तीवर आता पालिका रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या निवृत्तीचं वय ६० वरून ७० वर्ष करण्यासंदर्भात पालिकेकडे ठरावाची सूचना मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पालिका रुग्णालयातील डॉक्टर निवृत्त झाल्यानंतर खासगी रुग्णालयात काम करतात. मात्र इतर काही शहरात तज्ज्ञ डॉक्टर निवृत्त झाल्यावर ते त्याच रुग्णालयात पुढील तीन वर्ष प्राध्यापक म्हणून काम करतात. तसंच जर पालिका रुग्णालयात झालं तर नक्कीच रुग्णांना याचा फायदा होईल. परंतु, या निर्णयामुळे नवीन व तरूण डॉक्टरांना किती संधी मिळेल हा देखील प्रश्न अजून अनुत्तरित आहे.