ताणतणावामुळे वाढत चालले आहे नैराश्याचे प्रमाण

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नैराश्य हा एक आजार असून विविध हृदयरोगानंतर नैराश्य हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आजार होऊ लागला आहे. मेंदूमधील रसायनांचा समतोल बिघडल्याने नैराश्य येते. हे नैराश्य येण्याच्या विविध कारणांपैकी सर्वात पहिले कारण आहे. सिरोटोनिन हे सर्वात महत्त्वाचे रसायन आहे. मेंदूच्या विशिष्ट भागात सिरोटोनिनचे प्रमाण कमी झाल्यास नैराश्याची लक्षणे दिसू लागतात. मेंदूमधील दोन मज्जापेशी जेथे जोडल्या जातात, त्या सांध्यामधील न्यूरोट्रान्समीटर हे संदेशवहनाचे काम करतात. हे संदेशवहन बिघडणे हे मनोविकारांचे प्रमुख कारण मानले जाते.

अनेकदा मानसिक धक्का आणि क्लेशदायक घटनेमुळेही नैराश्य येते. पूर्वी नैराश्याचा आजार होऊन गेला असल्यास आयुष्यातील प्रतिकूल प्रसंगांनंतर हा आजार पुन्हा होण्याची जास्त शक्यता असते. प्रतिकूल परिस्थितीत मेंदूमधील रसायनांचा समतोल बिघडतो. या परिस्थितीत सुधारणा झालेली असली तरी हा समतोल बिघडलेलाच राहतो. नैराश्य पुन्हा उद्भवल्यास पुन्हा त्रास सुरू होतो. नैराश्य या आजारावर औषधोपचार अथवा सायकोथेरपीद्वारे उपचार केले जातात. आजार गंभीर असल्यास ईसीटी उपयुक्त ठरते. सध्या या आजारावर अतिशय परिणामकारक औषधी उपलब्ध आहे.एसएसआरआय तसेच एसएनआरआय प्रकारात मोडणाऱ्या या औषधीने सुमारे तीन आठवड्यांत नैराश्याची बरीचशी लक्षणे आटोक्यात येतात.

मात्र, पूर्ण बरे होण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषधोपचार बंद करू नयेत. सायकोथेरपीमध्ये नैराश्याला कारणीभूत  विचारपद्धती वा धारणा यावर चर्चा केली जाते. रोग्याच्या मनातील दु:ख समजून घेतल्याने, त्याचा आत्मविश्वास जागृत केल्याने नैराश्याची तीव्रता कमी होते. अशा रीतीने नैराश्य हा जरी आयुष्याचा बेरंग करणारा आजार असला, तरी मनोविकारतज्ज्ञ सल्ल्याने व औषधोपचाराने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. जीवन पुन्हा आनंददायी बनू शकते, यात शंका नाही.दैनंदिन जीवनात वाढते ताणतणाव, ढासळणारी नीतिमूल्ये, एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास इत्यादी कारणांमुळे नैराश्य या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १० टक्के लोकांना या आजाराने ग्रासल्याचे तज्ज्ञ सांगतात.कायम उदास किंवा निराश वाटणे, आनंददायक गोष्टी उदा. वाचन, टीव्ही पाहणे, खेळणे, गप्पा मारणे इत्यादीतील आनंद नाहीसा होणे, सतत थकवा जाणवणे, झोप येणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे, भविष्य अंधारमय आहे, जगण्यात अर्थ नाही असे वाटणे, आत्महत्येचा विचार मनात येणे, वारंवार रडू येणे, डोकेदुखी- अंगदुखी आदी नैराश्य किंवा उदासीनता या आजारांची प्रमुख लक्षणे आहेत.