उत्तर महाराष्ट्रातील जनतेसाठी राज्य सरकारने मोठी दिलासा देणारी योजना आणली आहे. राज्यातल्या गोर गरीब जनतेला वेगवेगळ्या पद्ध्तीच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यसरकार नवीन ‘मेडिकल हब’ सुरु करणार आहे. विशेष म्हणजे हे मेडिकल हब जळगाव जिल्ह्यातल्या चिंचोली गावात उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या इलाजासाठी आता मुंबई पुणे गाठायची गरज नाही. राज्य मंत्रिमंडळाने याला मान्यता देतानाच, या ‘मेडिकल हब’च्या उभारणीसाठी १२५० कोटी रूपयांचा निधीही मंजूर केला.
चिंचोली होणार ‘मेडिकल हब’
या ‘मेडिकल हब’मध्ये आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या ‘मेडिकल हब’मध्ये १०० विद्यार्थी संख्येचं मेडिकल कॉलेज, १०० विद्यार्थी संख्या असलेलं आयुर्वेद कॉलेज, अत्याधुनिक सुविधा असलेलं ५० विद्यार्थी संख्येचं दंत महाविद्यालय आणि होमियोपॅथी कॉलेजही असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील चिंचोली गावात, उभारण्यात येणाऱ्या या मेडिकल हबसाठी राज्य सरकारने १२५० कोटी रूपयांचा निधी मंजूर केलाय.
याबाबत बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी सांगितलं की, “हे ‘मेडिकल हब’ राज्यातील पहिलं, सर्व सोयी-सुविधा एकाच छताखाली असणारे मेडिकल हब असेल. या ‘मेडिकल हब’मुळे आपल्याला वैद्यकीय शास्त्रातील अत्याधुनिक संशोधन करता येईल, त्याचसोबत आयुर्वेदसारख्या विषयावरही संशोधन करता येईल.”
गिरीष महाजन पुढे म्हणतात, “येणाऱ्या काही वर्षात, जळगाव एक ‘मेडिकल हब’ म्हणून राज्यात नावारूपास येईल. या माध्यमातून आपण गोरगरीब जनतेला, ग्रामीण भागात चांगल्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देवू शकतो.”