आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ‘हडपसर मेडिकलअसोसिएशन’ने ‘डॉक्टर्स डे’ निमित्त सामाजिक प्रबोधन करणारे मूकनाट्य सादर केले. रस्त्यावरील अपघातामधील रुग्णांना वेळीच वैद्यकीय मदत मिळाली तर त्याचा जीव वाचू शकतो, त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता पुढे येऊन जखमींना मदत केली पाहिजे हा संदेश या मुकनाट्यतून देण्यात आला. या मुकाट्याची संकल्पना व दिग्दर्शन डॉ. अजय माने तर सहदिग्दर्शन डॉ. सचिन आरु यांनी केले. यामध्ये डॉ. रसिक गांधी, डॉ. वैभव वनारसे, डॉ.सौ.वंदना डुबे पाटील, डॉ. विशाल साळुंखे , डॉ. हिमांशू पेंडसे, डॉ. शिवांजली आटपाडकर,डॉ. शितल महाजन, डॉ. अर्चना शेळके, अदित्य कुलकर्णी यांनी सहभाग घेतला होता.
हडपसर मेडिकल असोसिएशन डॉक्टर्स डे डॉक्टरांसाठी साजरा करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या विषयांवर समाज प्रबोधन करीत असते. यावर्षी ‘रस्त्यावरील अपघात देवू माणुसकीचा हात’ ही संकल्पना घेऊन प्रबोधन केले. हडपसर मेडिकल असोसिएशनचा सांस्कृतिक संघ अनादीअनंत यानी याच संकल्पनेवर संजीवक हे मुकनाट्य डॉक्टर्स डे च्या पूर्व संध्येला हडपसरमधील लोहिया उद्यान येथील चंद्रमौलेश्वर मंदिर प्रांगणात सादर केले. उद्यानात फिरण्यासाठी आलेले आणि आसपासचे असे २५०- ३०० नागरिक उपस्थित होते. याच नाटकाचा आणखीन एक प्रयोग रात्री ८.३० ला आण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये झाला. तसेच हडपसर परिसरातील जास्तीत जास्त शाळा काॅलेज मध्ये हे मूकनाटय सादर करून विद्यार्थ्यांमध्ये रस्त्यावरील अपघाताबाबत जन जागृती करण्याचा हडपसर मेडिकल असोसिएशनचा मानस आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ शंतनू जगदाळे, सचिव डॉ मंगेश वाघ, कोषाध्यक्ष डॉ मंगेश बोराटे उपाध्यक्ष डॉ प्रशांत चौधरी, उपाध्यक्ष डॉ. सचिन अबणे डाॅ. सतीश सोनवणे डाॅ. सत्यवान आटपाडकर व डॉ स्वप्नील लडकत तसेच सर्व कार्यकारीणी सदस्य आणि पूर्ण अनादीअनंत ग्रुप यांचे सहकार्य लाभले.