झोपेचे शत्रू वेळीच ओळखा, अनेक आजारांपासून रहाल दूर
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हृदयरोग, उच्च रक्तदाब, रजोनिवृत्तीतून प्रक्रियेतून जाणाऱ्या महिला आणि टाइप-२ मधुमेहाने पीडित व्यक्तींना अनिद्रेचा त्रास होतो. अनियमित जीवनशैली, हार्मोनल बदल, वेळेवर भोजन न करण्याची सवयदेखील झोपमोडीस कारणीभूत आहे,असे अमेरिकेतील एनवाययू स्कूल ऑफ मेडिसिनचे सहयोगी प्राध्यापक जॉयस वॉल्सलॅबेन यांनी म्हटले आहे.झोपेचे शत्रू कोणते आणि या समस्येवर कोणते उपाय फायदेशिर आहेत, ते पाहुयात.
मित्रासोबत झालेला वाद वा कार्यालयातील तणाव लवकर विसरू शकत नाहीत आणि घरी आल्यावरही त्याचाच विचार करता का ? तर ही सवय तुमची झोप मोडू शकते. ड्युक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे इन्सोमॅनिया अँड स्लिप रिसर्च प्रोग्रामचे सहायक प्राध्यापक कॉलिन कार्ने यांच्या मते, ज्या लोकांचे त्यांच्या विचारांवर योग्य नियंत्रण नसते, ते चांगली झोप घेऊ शकत नाहीत. यासाठी चिडचिडेपणा व फुकाची चिंता केल्याने झोप न आल्यास बळजबरी झोपण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी घरातच थोडे फिरावे. तत्पूर्वी लाइट्स बंद असल्याची खात्री करावी.वीक-एंडच्या दिवशी अथवा त्याच्याआधी रात्री उशिरापर्यंत पार्टी व मौजमस्ती केल्याचाही झोपेवर परिणाम होतो. उशिरा झोपल्यास व सकाळी उशिरा उठल्यास शरीराचे अंतर्गत घड्याळ कोलमडते. अंतर्गत घड्याळ मेंदूतील मज्जातंतूवर नियंत्रण ठेवण्यासाठी, भूक नियमित राखण्यासाठी व शरीराचे तापमान सामान्य राखण्यासाठी आवश्यक असते, असे द हॉवर्ड मेडिकल स्कूल गाइड टू अ गूड नाइट्स स्लिपचे लेखक लॉरेन्स अँप्स्टेन यांनी म्हटले आहे.
उशिरा झोपल्यावरही सकाळी उठण्याची वेळ निश्चित असावी. वाटल्यास दिवसा अर्ध्या तासाची झोप घेता येईल. ही झोप जास्त नसावी, याची काळजी घ्यावी. कारण तिचा रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. मासिक पाळीदरम्यान किंवा त्यापूर्वी मेनोपॉजमधून जाणाऱ्या महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॉन हार्मोनची पातळी अनियमित असल्यास रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. यासाठी झोपण्याच्या दोन तास आधी कोमट पाण्याने स्नान करावे. त्यामुळे अनिद्रेचा त्रास होणार नाही. मेनोपॉजमधून जाणाऱ्या महिलांनी झोपण्याआधी कॅफिनचे सेवन करू नये. २०-३० मिनिटे नियमित एक्सरसाइज करावी.अनियमित जीवनशैलीमुळे अनेकजण जेवण न करताच झोपी जातात. या कारणामुळेही झोप मोडू शकते. जे लोक वजन घटवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो, असे मायो क्लिनिकचे निवृत्त प्राध्यापक पीटर हॉरी यांनी म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, झोपण्याआधी हाय प्रोटिन स्नॅक्सचे सेवन करायला हवे. उदा. चीजसोबत उकडलेले अंडे खाणे. शिवाय, बेडरूमच्या खिडक्यांमधून जर पथदिव्यांचा प्रकाश येत असेल किंवा रेल्वे ट्रॅकजवळ वा गोंगाट असलेल्या परिसरात घर असेल तर झोप मोडू शकते. या प्रकारच्या घडामोडी शरीराचे अंतर्गत घड्याळ बिघडवतात. नेहमी लक्षात ठेवा, झोपताना मोबाइल फोन बंद करून झोपा. खोलीत पाळीव प्राणी ठेवू नका, त्यांच्यामुळे झोप मोडू शकते.