आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सर्वांगासाठी परिणामकारक ठरणारा व्यायाम प्रकार म्हणजे दोरीउड्या होय. यास अष्टपैलू व्यायाम म्हणता येईल. यामध्ये दोरी हे एकमेव साधन असते. कुटुंबातील सर्वजण हा व्यायाम करू शकतात. यामुळे फिटनेस चांगला राहतो. तसेच शरीराचा प्रत्येक भाग सक्रिय होऊन वजन कमी होते. शरीराला चांगला आकार प्राप्त होतो. ही उत्तम कार्डियोव्हेस्क्युलर एक्सरसाइज आहे. हृदयासाठीही हा व्यायाम उत्तम आहे.
हे आहेत फायदे
* कॅलरी जाळण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त असून यामुळे वजनही कमी होते.
* यामुळे तुमचे हृदय, फुप्फुस आाणि स्नायूंना थेट फायदा पोहोचतो.
* यामुळे ताळमेळ बसवण्याची क्षमता, संतुलन, वेग आणि हात व डोळ्यांमधील ताळमेळ चांगला राहतो.
* गुडघे, टाचा, पोटऱ्या आणि जांघांना मजबुती मिळते.
* यामुळे मेंदू आणि नर्व्हस सिस्टिम अधिक सक्रिय होते.
* खांदे, हात आणि कमरेच्या स्नायूंवर थेट परिणाम होतो आणि त्यांना मजबुती मिळते.
कॅलरी मीटर
७० ते ७५ किलो वजनाच्या व्यक्तीने जर सरासरी वेगाने एक तास दोरीवरून उड्या मारल्या तर तो जवळपास ७३० कॅलरी जाळू शकतो. किती कॅलरी जाळता, हे वजन, वेग आणि दोरीवरून उड्या मारण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. साधारणपणे लठ्ठ लोक जास्त कॅलरी जाळतात. कारण त्यांना उड्या मारण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते.
अशी निवडा दोरी
दोरीउडी व्यायामासाठी योग्य दोरीची निवड करणे गरजेचे आहे. ही निवड करण्यासाठी तुम्ही दोरीच्या मध्यभागी उभे राहा. आता दोरीचे हँडल्स वर उचलून ओढा. हँडल तुमच्या खांद्याच्या हाडाच्या वरच्या भागाच्या जवळपास ६ इंच खाली असावे. म्हणजेच निम्म्या दोरीची लांबी जमिनीपासून तुमच्या खांद्याच्या हाडाच्या वरच्या भागाच्या खालपर्यंतच असावी. ही दोरी तुमच्या उंचीच्या हिशेबाने योग्य असेल आणि तुम्ही सहजपणे हालचाल करू शकाल. जास्त लांब दोरी तुम्हाला उंच उडी मारण्यासाठी भाग पाडू शकते. खूप लहान दोरी तुम्हाला पाडूही शकते.