चांगल्या आरोग्यासाठी हॉटेलमधील पदार्थ खाणे टाळा
आरोग्यनामा ऑनलाईन टीम- कामानिमित्त बाहेर रहावे लागत असल्याने अनेकजण हॉटेलमध्ये नाश्ता करतात, दुपारचे जेवण घेतात. अनेकदा आवडत्या रेस्टॉरन्टमधून आवडते पदार्थ ऑर्डर केले जातात. कधीतरी असे पदार्थ खाणे ठिक आहे. परंतु, नियमित हॉटेलमधील पदार्थ खाण्यात आल्यास आरोग्य बिघडू शकते. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ बनविण्याची पद्धत, वापरले जाणारे पदार्थ, स्वच्छता, पाणी अशा विविध गोष्टींमुळे हॉटेलचे खाद्यपदार्थ सतत खाणे त्रासदायक ठरू शकते. याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
रेस्टॉरन्टमध्ये आपण ज्यूस किंवा मॉकटेल ऑर्डर केल्यास त्यावरील पायनॅपल, लेमन किंवा मिंट लीव्हज गार्निश खाणे टाळावे. कारण ग्लासवर सजवण्याआधी ती व्यवस्थित धुतली जात नाहीत. त्यामुळे त्यावर विषाणू राहण्याची मोठी शक्यता असते. बरेचदा सँडविच आणि बर्गरला क्रंची बनवण्यासाठी त्यामध्ये कच्च्या भाज्या टाकल्या जातात. उदाहरणार्थ कच्ची पत्ताकोबी, कडधान्ये आदी. ते उगवण्यासाठी दमट हवामानाची गरज असते. अनेक धोकादायक विषाणू याच तापमानात वाढतात. रेस्तराँमध्ये कच्च्या भाज्या खाणे टाळले पाहिजे.
अनेक हॉटेलांमध्ये ग्राहक येण्याआधीच टेबलवर पाण्याचे ग्लास ठेवले जातात. ते पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. अशा ठिकाणी बाटलीबंद पाणी मागवावे. ग्लासमध्ये आधी ठेवलेले पाणी पिणे टाळावे. काही रेस्टॉरनटमध्ये अनेकदा ब्रेड बास्केट एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर दिली जातो. ती अनेकांच्या हातांतून फिरत असते. शेंगदाणे आणि टेबलवर ठेवलेल्या इतर मोफत पदार्थांबाबतही असेच होते. असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
जेवण बराच काळ ताजे राहावे यासाठी ते वारंवार गरम केले जाते. तसे केल्यास खाण्याचा स्वाद बदलतो आणि जेवण खरोखरच ताजे आहे की नाही हे कळत नाही. बुफेमध्ये प्रत्येक पदार्थासाठी वेगळा सर्व्हिग स्पून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अशा प्रकारे विषाणू पसरण्यास प्रतिबंध केला जातो. अनेक हॉटेल्समध्ये आजचा विशेष मेनू ठेवतात. बरेचदा अशा प्रकारचा मेनू सायंकाळपर्यंत एखादी डिश संपवण्यासाठी ठेवला जातो. डिश खरोखरच विशेष आहे की नाही याचा अंदाज करणे कठीण होते. त्यामुळे तो पदार्थ ताजा असल्याची खात्री करूनच खाल्ला पाहिजे.