आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मुंबईतील लोकलमध्ये प्रत्येक डब्यामध्ये गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी दोन जागा राखीव ठेवण्याची विनंती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना केली आहे. या मागणीचे पत्र रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पाठविण्यात आले आहे. गोयल यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास गर्भवती आणि स्तनदा मातांना दिलासा मिळू शकतो.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गर्भवती महिला आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना मुंबईतील लोकल ट्रेन मधून प्रवास करताना अनेक समस्या भेडसावतात. गर्दीच्या वेळी ट्रेन मधून प्रवास करताना या महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. अशावेळी या महिलांनी ट्रेन मधून प्रवास करणे कठीण ठरते. गर्भवती महिलांना अपंगांच्या डब्यातून प्रवास करण्यास परवानगी आहे. मात्र, गर्दीच्या वेळी त्या डब्यातून प्रवास करणे शक्य होत नाही. यासाठी आम्ही रेल्वे मंत्रालयाकडे गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी दोन जागा राखीव अथवा प्रथम प्राधान्य देण्याची विनंती करतो.
गर्दीमध्ये लोकल ट्रेन मधून गर्भवती आणि स्तनदा मातांना प्रवास करणे अवघड असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून दोन जागा राखीव देण्याबाबत विनंती केली आहे. ही विनंती मान्य झाल्यास गर्भवती व स्तनदा मातांना दिलासा मिळणार आहे.