आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बिघडलेली जीवनशैली आणि त्यामुळे खाण्यापिण्याच्या लागलेल्या वाईट सवयींमुळे दात पिवळे होतात. ही समस्या वाढत चालली आहे. दातांमध्ये ही समस्या कशामुळे होते याची विविध कारणे आहेत. दात चांगल्या प्रकारे स्वच्छ न केल्यामुळे बॅक्टेरियामुळे दातांवर प्लाक जमा होते. ते नंतर कडक होऊन टार्टरमध्ये रूपांतरीत होते. हे टार्टर स्वच्छ करण्यासाठी डेंटिस्टकडे जावे लागते. याला घरात स्वच्छ करणे शक्य नसते.
दातांच्या अॅनेमलचा टणकपणा हा अनुवंशिक असू शकतो. आई-वडिलांना किंवा कुटुंबातील कोणाचेही दात पिवळे दिसत असतील तर तुमचे अॅनेमल पातळ असेल आणि दात कायम पिवळे दिसू शकतात. तसेच पान आणि गुटखा देखील दातांचे आरोग्य बिघडतो. या व्यसनामुळे दात घाणेरडे होतात. यातील काथामुळे दातावर कायमस्वरूपी एक रंगीत स्तर दिसू लागतो. दात कायम पिवळे दिसतात. या अवस्थेत दातांना लवकर संसर्ग होतो. तसेच धूम्रपानाच्या धुरामध्ये टार, निकोटिन आणि इतर कित्येक प्रकारची रसायने असतात. हे दातांच्या अॅनेमलमध्ये जातात आणि पांढऱ्या अॅनेमलला पिवळे करतात. यामुळे हिरड्याही अशक्त होतात.
शिवाय खाण्या-पिण्याच्या कित्येक वस्तूंमुळे दात पिवळे होतात. यात चहा, कॉफी, टोमॅटो सॉस, सोया सॉस, रेड वाइन आदींचा समावेश आहे. काही रंगीत टॉफी किंवा आइस कँडी नियमित खाण्यामुळे याचा रंग दातांवर जमतो आणि त्यांना पिवळे व खराब करतो. तर काही औषधांमुळे दातांचा रंग खराब होतो. मुलांच्या दातांवर औषधांचा जास्त परिणाम होत असतो.