आरोग्यानामा ऑनलाइन टीम – मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक आरोग्यसेवा प्रदान करणाऱ्या अपेक्स हॉस्पिटलच्या समूहाने आपल्या पाच हॉस्पिटलमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी आरोग्य कार्डाचा शुभारंभ केला आहे. कामाला जाण्याच्या आणि येण्याच्या वेळेला ट्रेनमध्ये चढणे व उतरणे ही एक कसरतच असते. अनेकवेळा नागरिकांना ट्रेनमध्ये चढताना उतरताना दुखापती होत असतात.
अनेक जेष्ठ नागरिक पाय मुरगळणे, हात दुखणे, हाताला मुंग्या येणे तसेच कंबरेच्या दुखण्यांनी त्रस्त असतात. आज मितीला आजारांचे उपचार महाग होत असून मध्यमवर्गीय रेल्वे प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. हे आरोग्य कार्ड नाममात्र २०० रुपयांना उपलब्ध असणार असून आयुष्यभर या आरोग्य कार्डाच्या सवलती मिळणार आहेत. दर महिन्याला २ डॉक्टरांची मोफत ओपीडी, स्वस्तात औषधे मोफत ऍम्ब्युलन्स, वैद्यकीय तपासणी व वैद्यकीय उपचारांमध्ये भरघोस सूट अशा अनेक सवलती उपलब्ध असणार आहेत.
रेल्वे प्रवास करणे हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य अंग असून आयुष्याची रोजची लढाई लढायची असेल तर शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती राखणे महत्वाचे आहे याच सामाजिक भावनेतून मुंबईकरांना अपेक्स हॉस्पिटल समूहाने वैद्यकीय मदतीचा हात पुढे केला आहे. हे आरोग्य कार्ड मिळविण्यासाठी ९३२१३३७००० या क्रमांकावर रेल्वे प्रवाशी संपर्क करू शकतात. अंधेरी ते पालघर दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना या आरोग्य कार्डाने मोठा दिलासा मिळणार आहे.