पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – औषधांना दाद न देणाऱ्या (एक्सडीआर) टीबी रूग्णांमध्ये वाढ होत आहे. मागील चार वर्षांत एक्सडीआर टीबीचे ५५ रूग्ण आढळले आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.पुण्यात २०१३ मध्ये पहिला औषधांना दाद न देणारा म्हणजेच एक्सटेनसिव्हली ड्रग रेसीसटन्स टीबी रूग्ण सापडला होता.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नुकतेच एक सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षणातून औषधांना दाद न देणाऱ्या (एक्सडीआर) टीबी रूग्णांमध्ये सतत वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. मागील चार वर्षांत अशाप्रकारचे ५५ टीबी रूग्ण आढळून आले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जानेवारी २०१५ ते मार्च २०१९ या दरम्यान एकूण ५५ औषधांना दाद न देणाऱ्या टीबीचे रूग्ण आढळून आले. यामध्ये २०१८ साली सर्वात जास्त म्हणजे २५ टीबीच्या रूग्णांची नोंद आहे. २०१७ साली औषधांना दाद न देण्यारे एकूण १२ रूग्ण नोंदवले गेले. २०१६ मध्ये ८ आणि २०१५ मध्ये ७ टीबी रूग्ण्यांची नोंद करण्यात आली.
टीबीचे रूग्ण औषधांचा कोर्स पूर्ण करत नाहीत. यामुळे त्यांची संख्या वाढली आहे. औषधांना दाद न देणाऱ्या टीबीचे इन्फेक्शन दीर्घ काळ राहते. यामुळे घरातील इतर व्यक्तीला देखील टीबी होण्याचा धोका वाढतो, असे पुणे शहरातील टीबी अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले. औषधांना दाद न देणाऱ्या ८ टीबी रूग्णांना बेड्याक्युलीन औषधे देण्यात आली आहेत. अजून दोन रूग्णांना बाजारात नवीन आलेले डेलामानीड औषध देण्यात आले आहे.