पोलीसनामा ऑनलाइन टीम : काश्मिरमधील नागरिकांना आरोग्यसेवा देण्यासाठी पुण्यातील एका डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. पुण्यातील या फिजिओथेरेपिस्ट महिन्यातून एकदा श्रीनगरमध्ये जाऊन तिथल्या रूग्णांना मोफत आरोग्यसेवा पुरवतात. डॉ. मानसी पवार असे या डॉक्टरांचे नाव असून त्या औंधच्या एम्स रूग्णालयात कार्यरत आहेत. त्या फिजियोथेरेपिस्ट असून गरजेच्या ठिकाणी आरोग्यसेवा देण्याची त्यांची इच्छा होती. ती त्यांनी काश्मिरमधील नागरिकांना सेवा देऊन पूर्ण केली आहे. तसेच अन्य आरोग्यविषयक उपक्रमही त्यांनी राबवले आहेत.
डॉ. मानसी यांनी अनेक मोफत शिबिर भरवली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून डॉ. मानसी यांनी श्रीनगरमधील नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे कार्य सुरू केले आहे. काश्मीरमधील नागरिकांसाठी काम करण्याची किंवा त्यांना आरोग्यसेवा पुरवण्याची त्यांची पहिल्यापासून इच्छा होती. त्यानुसार एप्रिल २०१९ मध्ये प्रथमच त्या काश्मिरमध्ये गेल्या. तेथील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या मनात इतर राज्यांतील नागरिकांबाबत गैरसमज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा गैरससमज दूर व्हावा आणि तिथल्या लोकांना योग्य त्या आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी त्या ठिकाणी मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतल. आता डॉ. मानसी श्रीनगरच्या काही ग्रामीण भागात जाणार आहेत. तिथल्या लोकांच्या आरोग्यविषयी शिवाय इतर काय समस्याही त्या जाणून घेणार आहेत.
दर महिन्याला काही दिवस डॉ. मानसी ह्या श्रीनगरला जाऊन तिथल्या ओपीडीमध्ये रूग्णांवर उपचार करतात. तिथल्या नागरिकांकडून ओपीडीसाठी जागा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी रूग्णांना त्या मोफत उपचार देतात. आपल्या कामाचा आणि ज्ञानाचा काश्मिरच्या नागरिकांना फायदा व्हा हे त्यांचे उद्दिष्ट आहे. याशिवाय तिथल्या ग्रामीण भागात जाऊन आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्याचाही त्यांचा मानस आहे.