आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सोरायसिस या त्वचा विकाराचे प्रमाण अलिकडे खुप वाढले आहे. जागतिक सोरायसिस फेडरेशनच्या आकडेवारीनुसार शंभरपैकी दोन ते तीन व्यक्तींना हा आजार असल्याचे आढळले आहे. या आजारावर आधुनिक वैद्यकशास्त्रात कुठलाही खात्रीशीर उपाय नाही. आयुर्वेदात यास एककुष्ठ म्हणतात.
असा होतो आजार
या आजारात रोग प्रतिकारशक्ती विकृत होते. ती आपल्याच त्वचेच्या वरच्या स्तराला शरीराबाहेरील घटक समजते. त्वचेविरुद्ध काम करून तो स्तर शरीरापासून विलग करते. यामुळे त्वचेच्या बाहेरील स्तराची निर्मिती प्रक्रिया वेगाने सुरू होते. त्वचा लालसर व चांदेरी रंगाच्या चट्ट्यांनी व खवल्यांनी भरते. हा आजार कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला होतो.
करा हे उपाय
अॅपल व्हिनेगर
अर्धा कप पाण्यात २ चमचे अॅपल व्हिनेगर मिसळून त्वचेवर लावा. नंतर कोमट पाण्याने धुऊन घ्या. मात्र त्वचेवर जखमा नसाव्यात. अॅपल व्हिनेगरमधील अँटिबॅक्टेरियल गुणधर्मामुळे सोरायसिसच्या वेदना, जळजळ आणि रेडनेस कमी होतो.
दही
दही हलक्या हाताने त्वचेवर लावावे. वीस मिनिटांपर्यंत तसेच ठेवा. हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर अँंटिसेप्टिक शॅम्पूने त्वचा धुवून घ्यावी. जास्त कोरडेपणा असल्यास दह्यात खोबरेल तेल टाकावे. यामुळे त्वचेत ओलावा टिकून राहतो. कोरडा पापुद्रा दूर होतो.
आले
आल्याचा एक तुकडा पाण्यामध्ये उकळून ते पाणी चाळून घ्यावे. या पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळून ते सेवन करा. आल्यात अँटिमायक्रोबियल आणि अँटिसेप्टिवल गुणधर्म असल्याने संसर्गापासून बचाव होतो. रॅशेज, पिंपल्स, खाज इत्यादी त्वचा विकार बरे होतात.
खोबरेल तेल
खोबरेल तेल हलके गरम करा आणि त्याद्वारे त्वचेची मालिश करत रात्रभर तसेच राहू द्या. या तेलाऐवजी लिंबाच्या तेलाचा वापर करता येतो. यामुळे कोरडेपणा व त्वचेवरील पापुद्रा वाढत नाही.