आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सौंदर्य प्रसाधनांमध्ये आढळणाऱ्या पिथेलेट्स या द्रव्यांचे काही आगळेवेगळे दुष्परिणाम आता समोर आले आहेत. सौंदर्य प्रसाधने, केसांवर फवारले जाणारे स्प्रे आणि काही अन्नपदार्थांच्या पॅकिंगमध्ये घातक रसायने असतात. हे पिथेलेट्स प्लास्टिकच्या काही वस्तूंमध्येही आढळते. त्यांच्यामुळे महिलांचे रजोनिवृत्ती ही अपेक्षित वयाच्या आधीच होते, असे आढळून आले आहे. पिथेलेट्सचा परिणाम महिलांच्या प्रजोत्पादन क्षमतेवर होतो. विशेषत: त्यांच्या ओव्हरीवर त्याचे काही असे परिणाम होतात की, त्यांची निर्मिती थांबते आणि परिणामी महिलांची रजोनिवृत्ती लवकर होते. काही जणींच्या बाबतीत तर ती १० ते १५ वर्षे आधीसुद्धा होऊ शकते.
निरोगी आणि सशक्त महिलांच्या आयुष्यामध्ये हा काळ ५१ व्या वर्षी सुरू होत असतो. परंतु पिथेलेट्समुळे काही महिलांना त्याची चाहूल पस्तिशीनंतरच लागते. रजोनिवृत्ती ही वृद्धावस्थेकडची वाटचाल असते आणि तिचे काही परिणाम शरीरावर होत असतात. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात, कंबरदुखी सुरू होते, अशक्तपणा यायला लागतो. हृदयविकार बळावण्याची शक्यता निर्माण होते. अशा सगळ्या तक्रारी काही प्रमाणात सर्वांच्या आयुष्यात पन्नाशीनंतर सुरू होतात. परंतु पिथेलेट्सचा परिणाम असा होतो की, हे सगळे त्रास पन्नाशीच्या आधीच सुरू होतात.
ब्रिटनमध्ये सुमारे ५७०० महिलांवर पिथेलेट्सचा परिणाम काय होतो, याचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या रक्तात आणि लघवीमध्ये पिथेलेट्स आढळले. ज्यांच्या रक्तात ते विपुलपणे आढळले त्यांचे तारुण्य आणि जनन क्षमता लवकर ओसरत असल्याचे निरीक्षणांती आढळून आले. त्यामुळे आता शास्त्रज्ञांनी पिथेलेट्सचा समावेश असलेल्या सौंदर्य प्रसाधनांपासून आणि घरगुती वापराच्या प्लास्टिकच्या वस्तूंपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.