आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आंतरराष्ट्रीय योग दिवसाननिमित्त हरयाणातील मनोहर लाल सरकार रोहतकमध्ये केंद्रीय गृहमंत्री यांच्यासोबत योगदिन साजरा करणार आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री मनोहर लाल, हरियाणाचे मंत्री अनिल वीज, मनीष ग्रोवर आणि खासदार डॉ. अरवद शर्मा हे योग करणार आहेत. तसेच योग दिनाच्या पूर्वसंध्येला मनोहर सरकारने हरियाणात योग परिषद गठीत केली असून ही परिषद गावे आणि शहरांमध्ये योगाचा प्रचार आणि प्रसार करणार आहे. तसेच युवकांना युवा ऑलिम्पियाडसाठी तयार करणार आहे.
हरियाणा सरकारने स्थापन केलेली योग परिषद आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच आयुष विभागाच्या नियंत्रणाखाली काम करणार आहे. प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य देणे तसेच व्यक्तीमत्व विकासाठी दिनचर्येत योगाभ्यासाचा समावेश करण्यासाठी प्रेरित करण्याचे काम करणार आहे. ही परिषद हरियाणातील युवकांना योगाभ्यासात निष्णात करणार असून यामुळे हे युवक योगा ऑलिम्पियाडमध्ये चांगले काम दाखवू शकतील. शुक्रवारी हरियाणातील ७९ ठिकाणी तीन लाख लोक एकत्र येत योगा करणार आहेत. सकाही सात ते आठ या कालावधीत योगासने केली जाणार आहेत.
यासाठी कॉलेज, विद्यापीठातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक असणार आहे.पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त रोहतकमध्ये मेला ग्राऊंडवर शुक्रवारी आयोजित या राज्यस्तरीय समारंभात केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री मनोहर लाल, आरोग्यमंत्री अनिल वीज यांच्यासोबत सुमारे २५ हजार साधक एकाच वेळी योगासने करणार आहेत. तसेच यावेळी उपस्थितांना अमित शाह हे संबोधितही करणार आहे. सकाळी योगासनांना सुरूवात होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.