जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी बाळाला आले दात

baby
May 17, 2019

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बंगळुरू येथील एका दाम्पत्याला ३ एप्रिल रोजी मुलगी झाली; परंतु आश्चर्याची बाब म्हणजे या मुलीला जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ एप्रिललाच दोन दात आले असल्याचे निदर्शनास आले. सर्वसाधारणपणे बाळाला सहा महिन्यांनंतरच दात येत असतात; परंतु या बाळाला दोन दिवसांतच दात आल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.हे दात पिवळ्या रंगाचे आणि अर्धविकसित होते. सदर दाम्पत्याने घाबरून जात तत्काळ दवाखाना गाठला आणि शहरातील मदरहूड रुग्णालयातील डॉक्टर नीतू पुन्हानी यांना दाखवले.

यानंतर डॉक्टरांनी दाम्पत्याला घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सांगत, लाखात अशी आश्यर्यकारक घटना समोर येत असते, असे सांगितले. नवजात बाळाला दूध पाजण्यासाठी कसलीही अडचण होऊ नये, यासाठी हे दोन्ही दात काढून टाकणे गरजेचे असल्याचा सल्ला दिला. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मागील आठवड्यात हे दोन्ही दात काढून टाकण्यात आले आहेत. सदर बाळाच्या आईचे नाव मधुचंद्रिका तर वडिलांचे प्रदीप कुमार असल्याचे कळते. हे कुटुंब एसआरबीआर लेआऊटमध्ये राहते.