‘कॉन्टॅक्ट’ लेन्स लावताना सावधगिरी बाळगा, सविस्तर जाणून घ्या

‘कॉन्टॅक्ट’ लेन्स लावताना सावधगिरी बाळगा, सविस्तर जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दृष्टी कमी होणे ही समस्या अलिकडे सर्वच वयोगटात दिसून येते. यामागे अनुवंशिकता हे कारण असले तरी अन्य कारणे सुद्धा आहेत. दृष्टी कमी झाल्यास चष्मा वापरणे हाच पर्याय असतो. मात्र, अलिकडे चष्माऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरलय  जातात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे कॉन्टॅक्ट लेन्स डोळ्यांना लावले जातात. मात्र, डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करताना काही सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे.

‘कॉन्टॅक्ट’ लेन्स लावताना अशी घ्या काळजी 

* डॉक्टरांनी सल्ला दिल्याशिवाय लेन्सचा वापर करू नका. तसेच जोपर्यंत लेन्स लावण्याचा सल्ला दिला आहे, तोपर्यंतच लावाव्यात. दिलेल्या काळानंतर याचा वापर केल्यास डोळ्यांना नुकसान होऊ शकते. लेन्सची केसदेखील तीन महिन्यांनंतर बदलावी. ती दररोज स्वच्छ करावी.

* झोपेत असताना डोळे पापण्यांच्या पेशीतून ऑक्सिजन घेतात, पण कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करताना डोळे बंद झाल्यास ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. यासाठी झोपताना याचा वापर करू नका.

* कॉन्टॅक्ट लेन्स काढल्यानंतर जर डोकेदुखी, डोळे दुखणे आणि खाज येत असेल, तर ही लक्षणे एकंथामिबा संसर्गाची असू शकतात. अशा वेळी लेन्सचा वापर लगेच बंद करावा. नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. हा संसर्ग शरीराच्या इतर भागात पसरू शकतो.

* कॉन्टॅक्ट लेन्स दररोज स्वच्छ केल्या पाहिजेत. कॉन्टॅक्ट लेन्सची स्वच्छता न झाल्यास कॉर्नियाच्या संसर्गातून सूक्ष्मजीव डोळ्यात प्रवेश करतात. अशा स्थितीत डोळ्यांना गंभीर संसर्ग होण्याचा धोका असतो.

* कॉन्टॅक्ट लेन्स लावणे आणि काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. यामुळे लेन्स दूषित होणार नाहीत. लेन्स नखांनी पकडल्यास त्यावर स्क्रॅचेस येऊ शकतात. नखांमुळे डोळ्याच्या बुबळांनादेखील इजा होते. कॉन्टॅक्ट लेन्स बेडवर बसून लावावी, कारण ती पडली तरी बेडवर पडेल.

* लेन्सला सोल्युशनमध्ये पूर्णपणे बुडवून ठेवावे. डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणतेही क्लीनर प्रॉडक्ट वापरू नये. कॉस्मेटिक लोशन, क्रीम किंवा स्प्रेच्या संपर्कात येऊ देऊ नये. लेन्स स्वच्छ केल्यानंतर ओले ठेवू नका. आद्र्रतेमुळे जंतू वाढण्याचा धोका असतो.

* पोहताना, झोपताना, गाडी चालवताना, जोरदार वारे वाहत असताना कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करू नका. गाडी चालवताना किंवा जोरदार वारे असताना डोळ्यात धूळ जाते. परिणामी, लेन्सवर ओरखडे पडू शकतात.

कॉन्टॅक्ट लेन्सचे प्रकार

१) सॉफ्ट लेन्स ही जेलीप्रमाणे मऊ असते. याच्या मटेरियलमध्ये पाणी असते. त्यातून कॉर्नियाला ऑक्सिजन मिळते. सॉफ्ट लेन्समध्ये डिस्पोजेबल लेन्स जास्त सुरक्षित असते. मात्र, अनेक दिवस याचा वापर केल्याने डोळ्यात प्रोटीन जमा होऊ लागतो. त्यामुळे लेन्स धुरकट होऊ लागतात आणि त्यांना लगेच बदलावे लागते.

२) सेमी सॉफ्ट लेन्स या कॉर्नियापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यात मदत करतात. याला सर्वोत्तम लेन्स म्हटले जाते. खासकरून सिलिंड्रिकल नंबर असलेल्यांसाठी त्या असतात. लेन्सच्या तुलनेत याची देखभाल अत्यंत सोपी असते. हे जास्त टिकाऊ आहे, म्हणून लोक दीर्घकाळापर्यंत याचा वापर करतात, पण लेन्स कितीही टिकाऊ असली तरी वर्षाच्या आत बदलावी.

३) हार्ड लेन्स कठीण, हलक्या आणि जास्त टिकाऊ असतात. म्हणून याचा दीर्घकाळासाठी वापर केला जाऊ शकतो. तरी सध्या याचा वापर करण्याचा सल्ला दिला जात नाही. कारण कठीण असल्यामुळे याच्या वापराचे अनेक धोके आहेत. याच्या वापराने कॉर्नियाला ओरखडा येण्याचा धोका असतो. यातून ऑक्सिजन आरपार जाऊ शकत नाही. यामुळे कॉर्नियाचे नुकसान होते. रात्री झोपताना काढाव्यात.

४) डिस्पोजेबल लेन्स वापरल्यानंतर फेकून द्याव्या लागतात. ज्यांच्या डोळ्यात संसर्ग असतो, त्यांच्यासाठी या अत्यंत उपयोगी आहेत. लोक रंगीत लेन्सदेखील डिस्पोजेबलच घेणे पसंत करतात. एक वेळ वापरल्यानंतर जास्त खर्च होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु