आरोग्यनामा ऑनलाइन टीम : मुंबईच्या नायर रूग्णालयातून पाच दिवसांचे बाळ एका महिलेने १३ जूनला पळवून नेले होते.सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला कैद झाली होती. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. बाळ पळविणाऱ्या या महिलेचा शोध सुरू असताना केवळ एका नर्सच्या सर्तकतेमुळे हे बाळ पुन्हा आपल्या आईच्या कुशीत विसावले आहे.ज्या दिवशी बाळ नायर रूग्णालयातून पळविण्यात आले त्यादिवशी रात्री सांताक्रुझमधील व्हि. एन. देसाई रुग्णालयात रात्री एक महिला तिच्या बाळाला घेऊन आली. ४ दिवसांपूर्वीच घरी प्रसूती झाली असून बाळाच्या तपासण्या करायच्या असल्याचे तिने सांगितले. रात्रपाळीसाठी असलेलेया नर्स भक्ती तरे यांना या महिलेबाबत संशय आला. एकंदरच तिच्याकडे पाहिल्यानंतर तिची प्रसूती झाली असावी असे त्यांना वाटले नाही. तिने बाळाला जन्म दिला नाही,असा संशय आल्याने त्यांनी रूग्णालय प्रशासनाच्या कानावर हा प्रकार घातला आणि तिची सोनोग्राफी चाचणी केली.
या चाचणीतून त्या महिलेची प्रसुती झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचा संशय खरा ठरला. ती महिला खोटे बोलत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार सुरू असतानाच नर्स भक्ती तरे यांच्या पतीचा त्यांना फोन आला आणि त्यांनी नायर रुग्णालयातून एक बाळ चोरीला गेल्याची बातमी त्यांना सांगितली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचेही पतीने सांगितल्याने भक्ती यांनी तो व्हिडिओ ताबडतो त्यांना पाठविण्यास सांगितला. हा व्हिडिओ त्यांनी पाहिला असता व्हिडिओतील महिला, बाळ आणि रुग्णालयात आलेली महिला, बाळ यांच्यामध्ये साम्य आढळले. नायर रुग्णालयातून बाळ चोरणारी महिला हीच आहे, याची त्यांना खात्री पटली. या कोणतीही खबर लागू नये म्हणून भक्ती यांनी सावधानता बाळगत ताबडतोब बाळासह महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतले.
भक्ती यांनी नायर रुग्णालयातील बाळ चोरीची घटना, त्यांच्याकडे आलेला व्हिडिओ आणि ती संशयित महिला आणि बाळ याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती देऊन रुग्णालय प्रशासनाला सतर्क केले.यानंतर तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले. पोलीसांनी व्हि. एन. देसाई रुग्णालयात येऊन महिलेची चौकशी केली असता त्या महिलेने ते बाळ आपले नसून नायर रुग्णालयाातून चोरल्याची कबुली दिली. नर्स भक्ती तरे यांची सतर्कता आणि सावधगिरी यामुळे अपहरण झाल्याच्या ५ तासांतच बाळ सापडले. त्या बाळाला सुखरूप त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले. बाळ चोरणाऱ्या महिलेला बाळाचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे मुंबईचे डीसीपी अभिलाष कुमार यांनी सांगितले.