आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कॅन्सर या जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. २०४० पर्यंत दरवर्षी जगभरात १.५ कोटींपेक्षा जास्त लोकांना कॅन्सरवरील कीमोथेरपीची गरज पडेल. कॅन्सरच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने भविष्यात सुमारे १ लाख डॉक्टरांची गरज भासणार आहे.
जगभरात कॅन्सरचा वाढता धोका हा आरोग्य क्षेत्रासाठी एक मोठे संकट आणि आव्हान आहे. सध्या आणि भविष्यात रूग्णांच्या सुरक्षित उपचारासाठी वैश्विक कार्यबल तयार करण्यासाठी वेळीच रणनिती आखणे गरजेचे असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. एका संशोधनानुसार २०१८ ते २०४० पर्यंत जगभरात दरवर्षी कीमोथेरपी करणाऱ्या रूग्णांची संख्या ५३ टक्क्यांच्या वाढीसह ९८ लाख ते १.५ कोटी होऊ शकते. राष्ट्रीय, क्षेत्रीय आणि वैश्विक स्तरावर कीमोथेरपीसाठी प्रथमच असे संशोधन करण्यात आले आहे. सिडनी यूनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलियाच्या इंगहॅम इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड मेडिकल रिसर्च, किंगहार्न कॅन्सर सेंटर, लीव्हरपूल कॅन्सर थेरपी सेंटर आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर व लिओनच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.