आरोग्यनामा ऑनलाइन टीम : महापालिका रुग्णालयात न्यूबॉर्न स्क्रिनिंग सुविधा उपलब्ध करून द्यावी,असा प्रस्ताव पालिकेच्या केईएम रुग्णालयाने पालिका प्रशासनाला दिला आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.गर्भातील बाळाची योग्य पद्धतीने वाढ,पाहण्यासाठी सोनोग्राफी केली जाते. मात्र अनेकदा बाळातील व्यंग किंवा आजार याचे निदान सोनोग्राफीतून होत नाही. बाळ जन्माला आल्यानंतर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी त्याचे निदान होते आणि वेळेत उपचार न केल्याने बाळाला त्रास होतो.
मुंबई पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कुपर रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या सर्वाधिक आहे. केईएममध्ये ७ हजार, शीव रुग्णालयात १० हजार, नायर मध्ये ४,५०० आणि कुपर रुग्णालयात ३,५०० प्रसूती होतात. त्यामुळे न्यूबॉर्न स्क्रिनिंग सुरू झाल्यास इतक्या नवजात शिशूंना त्याचा फायदा होणार आहे. न्यूबॉर्न स्क्रिनिंगद्वारे चार विविध प्रकारच्या आजारांचे रक्तचाचणीद्वारे निदान करता येते. कंजेनायटल हायपोथायरॉडिझम, जी ६ पीडी डिफिशिन्सी, कंजेनायटल अँडरेनल, हायपरप्लासिया, थॅलेसेमिया आणि सिकलसेल यांचा समावेश आहे. खासगी रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध आहे. पण ही चाचणी खूप खर्चिक असल्याने पालिका रुग्णालयात ही चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासन कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. त्यानुसार आता स्थायी समितीत हा प्रस्ताव आहे याचा नक्कीच फायदा होईल. गर्भवती महिलांच्या सोनोग्राफीत बाळामध्ये व्यंग असल्याचे दिसून येते.
अशावेळी जोडप्याचे समुपदेश केले जाते. पण बाळाच्या जन्मानंतर त्यांच्या आजारावर पुढील उपचार नवजात शिशू विभागाद्वारे केले जातात. यात न्यूबॉर्न स्क्रिनिंग हा महत्त्वाचा भाग असतो. यात रक्त चाचणीद्वारे बाळाला कुठला आजार आहे का? हे जाणून त्यावर उपचार केले जातात. त्यामुळे निओनॅटल विभागातील डॉक्टरांची भूमिका खूप महत्त्वाची असते.जन्मानंतर बाळामध्ये व्यंग असल्याचे पटकन कळल्यास त्यावर योग्य पद्धतीने डॉक्टरांना उपचार देता येतात. यासाठी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात न्यूबॉर्न स्क्रिनिंग चाचणी उपलब्ध करून देण्याबाबत पालिका प्रशासन विचार करत आहे. केईएम रुग्णालयाने याबाबतचा प्रस्ताव पालिकेला दिला आहे. या चाचणीद्वारे बाळातील व्यंग किंवा आजार याचे वेळीच निदान झाल्यास योग्य उपचार करणे शक्य होणार आहे