‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

पोलीसनामा ऑनलाइन टीम : अनेक आजार हे घरच्या घरी बरे करता येऊ शकतात. यासाठी होम हेल्थ केअर ही संकल्पना रूजणे गरजेचे आहे. आज एखादा साधा आजार झाला तरी दवाखान्यात जावे लागते. घरच्या घरी उपचार करण्यासारखे जे आजार आहेत, त्यांच्यासाठी दवाखान्यात जाण्याची खरं तर गरज नाही. यासाठी भारतात होम हेल्थ केअर ही संकल्पना चांगल्या पद्धतीने वापरली गेली पाहिजे. भविष्यात ती येथे चांगली रूजेल असे म्हटले जात असले तरी ही सुविधा खुपच महागडी असल्याने तिला भारतात किती पसंती मिळते याबाबत शंका आहे.
होम हेल्थ केअरमध्ये फक्त वॉकर आणि व्हिलचेअरचा समावेश असतो अशीच कल्पना यापूर्वी होती. परंतु, सध्या होम हेल्थ केअरमध्ये हेमोडायलेसिस आणि केमोथेरेपीचाही समावेश होतो. ही पद्धती अधिक रूजवण्यासाठी लोकांमध्ये पुरेशी जनजागृती झाली पाहिजे. होम हेल्थ केअरमुळे अनेक समस्या सुटण्यास मदत झाली आहे. सध्या भारतात अशा काही संस्था आहेत ज्या मोठ्याप्रमाणात होम हेल्थ केअरचे काम करत आहेत. यातून मोठ्यासंख्येने रोजगारही उपलब्ध झाला आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये या सुविधा सध्या उपलब्ध असून भविष्यात त्या अन्य ठिकाणीही उपलब्ध होऊ शकतात. हळूहळू ही संकल्पना भारतात सर्वत्र चांगला जोर धरू शकते. या संकल्पनेतून केमोथेरेपी आणि आयसीयूसारख्या सुविधा देखील घरी पुरवण्यात येतात याबाबत लोकांना अजून माहिती नाही.
होम हेल्थ केअरच्या माध्यमातून सध्या  वेन्टीलेशन, स्लिप अ‍ॅप्निया केअर, पॅलेटीव्ह केअर, पोस्ट ट्रामा, रिहॅब इत्यादी आरोग्य सुविधा घरी पुरवण्यात येतात.या सुविधेबाबत मुंबईतील नेफ्रोलॉजीस्ट डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले की, ७ वर्षांपूर्वी हेमोडायलेसिसची सुविधा उपलब्ध केली होती आणि त्याद्वारे१०,००० रूग्णांचे डायलेसिस करण्यात आले. विशेष म्हणजे हे उपचार रूग्णांच्या सोयीनुसार केले जातात. मात्र, रूग्णालयापेक्षा या उपचारांची किंमत दुपटीने किंवा तिपटीने जास्त असते. मात्र तरीही अनेकजण होम हेल्थ केअरचा पर्याय निवडतात. या संकल्पनेसाठी सरकार पुढाकार घेताना दिसत नाही. त्याउलट पाश्चिमात्य देशात सरकार रूग्णांना होम हेल्थ केअरसाठी मशिन्स पुरवते जेणेकरून रूग्णांचे पैसे वाचतात. ज्यांना कामात प्रचंड व्याप आहे ते लोक होम हेल्थ केअरला पसंती दर्शवतात.