आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्त्रियांना युरीन इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त असते. स्त्रियांना वारंवार होणाऱ्या व दीर्घकाळ टिकणाऱ्या संसर्गाचे प्रमाण इतके जास्त आहे, की आयुष्यभर हा त्रास सहन करणाऱ्या स्त्रियांची संख्या २ पैकी एक असते असे काही तज्ज्ञांचे मत आहे. या समस्येत मूत्रमार्गाला इजा होते. खालच्या मूत्रमार्गाला इजा झाल्यास त्याला ‘ब्लॅडर इन्फेक्शन’ असे म्हणतात, तर वरच्या मूत्रमार्गाला संसर्ग झाल्यास त्याला ‘किडनी इन्फेक्शन’ असे म्हणतात. हे टाळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो. या उपायांनी आपली ही समस्या नियंत्रणात येण्यास मदत होईल.
१) आहार
भरपूर पाणी प्या. प्रत्येक खाण्याबरोबर किमान एक ग्लास पाणी पिण्याने सुरुवात करा. लघवी नेहमीच्या फिकट पिवळ्या रंगापेक्षा जास्त गडद झाल्यास, त्याचा अर्थ शरीराला आवश्यक पाणी मिळालेले नाही असा होतो. म्हणून भरपूर पाणी प्या. क्रॅनबेरीचा रस आणि गोळ्यांमुळे मूत्रमार्गाचा संसर्ग कमी होतो हे सिद्ध झालेले नाही. तरुण स्त्रियांमध्ये ते जास्त प्रभावी ठरले आहे.
२) औषधे
इस्ट्रोजेनिक व्हजायनल क्रीममुळे मूत्राशय संसर्गाला प्रतिबंध होतो. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांना इस्ट्रोजेन गोळ्या किंवा पॅच घ्यायला सांगितले जाते. क्रीममुळे मुत्राशयाभोवती असलेल्या पेशी निरोगी राहतात तसेच संसर्गाला प्रतिबंध होतो. प्रतिबंधात्मक उपचार म्हणून औषधे दिली गेली असल्यास डॉक्टरांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
३) व्यायाम
शारीरिक व्यायाम करताना दर थोडय़ा वेळाने लघवीला जाणे, भरपूर पाणी व इतर द्रव पदार्थ पिणे आवश्यक आहे. लैंगिक संबंधानंतर जास्त काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे मूत्राशयाच्या भागात जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता फार जास्त असते.
४) कपडे
घट्ट बसणारी, तंग अंतवस्त्रे घालू नये. अशा कापडांमुळे ओलावा तयार होऊन त्वचा मऊ होते व मूत्राशयाच्या पुढच्या बाजूस जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता वाढते. नेहमीच्या वापरासाठी सुती अंतर्वस्रे वापरणे केव्हाही चांगले.
मात्र अशी काळजी घेऊनही संसर्ग झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. लघवीचा नमुना तपासणीसाठी द्यावा. योनीमार्गातून अतिरिक्त स्त्राव जात असेल किंवा योनीला सूज व संसर्गासाठी इतर लक्षणे दिसत असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.