आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आयब्रो सुंदर आणि आकर्षक असल्यास महिलांचे सौंदर्य आणखी खुलते. यासाठी मुली आणि महिला नियमित पार्लरमध्ये जाऊन आयब्रोजची काळजी घेत असतात. आयब्रो जाड आणि दाट असल्यास अजून सुंदर दिसतात. आयब्रो दाट, रेखीव आणि काळ्या दिसण्यासाठी पेन्सिलचा वापरही केला जातो. मात्र, काही घरगुती उपाय केल्यास नैसर्गिकरित्या आयब्रो जाड आणि उठावदार होऊ शकतात. यासाठी ७ नैसर्गिक उपाय असून ते जाणून घेवूयात.
कांद्याचा रस
कापसाच्या साहाय्याने कांद्याचा रस आयब्रोवर लावा. १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा प्रयोग नियमित केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
एरंडेल तेल
यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात. परिणामी केसांची वाढ सुधारते. रोज रात्री आयब्रोला एरंडेल तेल लावून झोपा.
खोबरेल तेल
विरळ आयब्रो असल्यास हा एक उत्तम उपाय आहे. कोमट तेल आयब्रोला लावल्याने त्वचा मुलायम होण्यास मदत होते. तेलाऐवजी नारळाचे दूधही वापरू शकता.
जास्वंद
जास्वंदाची पेस्ट लावल्यास केसांची वाढ होते. यामुळे केसांची मूळं घट्ट होतात.
कोरफड
यामुळे आयब्रोची वाढ सुधारते तसेच त्वचा मुलायम होण्यास मदत होते. आयब्रोला नियमित कोरफडीच्या गराने मसाज करावी.
मेथीचे दाणे
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करा. सकाळी तयार पेस्ट आयब्रोवर लावा व ५ मिनिटांनी धुवा. यामुळे केस वाढत नसले तरीही त्याची गळती रोखण्यास आणि ब्रॉडनेस वाढवण्यास मदत होईल.
बदाम तेल
या तेलाचा वापर नियमित केल्याने आयब्रो वाढण्यास आणि त्याचे पोषण होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने मसाज करा.