आरोग्यनामा ऑनलाइन टीम – संगीत हे मन ताजेतवाने करते. आणि मन प्रफुल्लित असले की, आरोग्यही चांगले रहाते, असे आपण अनेकदा ऐकत आलो आहोत. मात्र, वैद्यकीय पातळीवर यास अजूनपर्यंत ठोस आधार नाही. गरोदर माता आणि गर्भातील बाळाची वाढ, आरोग्य यावर म्युझिक थेरेपीचा कोणता परिणाम होतो यासंदर्भात कोल्हापूरमधील स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांच्या पुढाकाराने संशोधन करण्यात येणार आहे. १ जुलैच्या डॉक्टर्स डे चे औचित्य साधून या संशोधनाला सुरूवात होईल. यासाठी देशभरातील संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.
गरोदरपणातील ताण-तणाव, काळजी व चिंतेमुळे गर्भातील बाळाची वाढ योग्य पद्धतीने होत नाही. अशा स्थितीत गरोदर मातेच्या व तिच्या गर्भातील बाळाच्या आरोग्यावर म्युझिकल थेरपी चा होणारा फायदा तपासण्यासाठी हे संशोधन होणार आहे. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, पित्त, पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी संगीत ऐकणे लाभदायक असल्याचे म्हटले जाते. मानसिक ताण कमी करण्यासाठीही संगीत लाभदायक ठरते. स्मृतीभ्रंश आणि विसरभोळेपणा होण्याचे प्रमाण नियमित संगीत ऐकणाऱ्यांमध्ये खूप कमी होते, असा दावा करण्यात येतो. यासाठी संगीत ऐकण्यामुळे गरोदर महिला तसेच अर्भकावर कोणते परिणाम होतील, हे शोधण्यासाठी डॉ. पत्की यांनी हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही कारणांमुळे गरोदर महिलांमध्ये गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. मधुमेहाचे प्रमाण वाढणे, रक्तदाब, अर्भकाची कमी वाढ, गर्भजलाचे कमी प्रमाण, अशक्त बाळांचा जन्म अशा समस्या आढळून येतात. तसेच काही महिलांमध्ये प्रसूतीबाबत भिती असल्याने त्याचा बाळावर परिणाम होत असतो. यामुळे मातांची मानसिक स्थिती उत्तम रहण्यासाठी संगीताचा उपयोग होता का ? यासाठी संशोधन करण्यात येणार आहे. या संशोधनात १०० गर्भवती महिलांचे प्रत्येक दोन गट तयार करण्यात येणार आहेत. एका गटातील महिलांवर सर्वसाधारण उपचार केले जातील. तर दुसऱ्या गटातील महिलांवर उपचारासह म्युझिकल थेरपी केली जाईल. याद्वारे सातव्या महिन्याच्या गरोदर मातांना आठवड्यातून तीन दिवस दरदिवशी २० मिनिटे भावगीत, सुगम संगीत ऐकवले जाणार आहे. त्यांच्या चाचण्या करून निष्कर्ष काढले जातील. साधारणतः तीन वर्ष हे संशोधन केले जाणार आहे. गर्भवती असताना तिसऱ्या महिन्यापासून बाळ बाहेरील आवाज ऐकू शकते. त्यामुळे आईला सांगितले जाईल की, तुम्हाला आवडेल ते संगीत ऐका म्हणजे बाळाच्या विकासात मदत होईल. तसेच गरोदर महिलांवरील संगीत श्रवणाच्या प्रयोगानंतर जन्म झालेल्या बाळाच्या आकलन क्षमतांवरही विशेष अभ्यास केला जाणार आहे, अशी माहिती स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांनी दिली.