मुंबई : आरोग्यनामा ऑनलाइन – मुंबईत १६ वर्षीय ब्रेनडेड मुलाचे अवयवदान केल्यानेअनेक गरजू रूग्णांना जीवदान मिळाले आहे. नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात ही अवयवदान प्रक्रिया पार पडली. तर स्वादुपिंड ज्युपिटर रुग्णालयात देण्यात आले. या मुलाच्या कुटुंबाच्या परवानगीनंतर या ब्रेनडेड मुलाचे स्वादुपिंड, हृदय, यकृत, किडनी आणि डोळे दान करण्यात आले. स्वादुपिंड ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात पाठवण्यात आले. मुंबईतील हे पहिले स्वादुपिंड दान आणि प्रत्यारोपण आहे.
१८ मे, २०१९ रोजी १६ वर्षांच्या मुलाचा अपघात झाल्यानंतर त्यास एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. २१ तारखेला त्याला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. या मुलाचे वडील आणि भावाला अवयवदानासाठी समुपदेशन डॉक्टरांनी केले. प्रथम या मुलाचे कुटुंबिय मुलगा ब्रेनडेड झाला आहे हे मानण्यास तयार नव्हते. बराच वेळ समुपदेशन केल्यानंतर ते अवयवदानासाठी तयार झाले, असे एमजीएम रुग्णालयातील झेडटीसीसी समन्वयक वैभव भोसले यांनी सांगितले. तर ज्युपिटर रुग्णालयातील झेडटीसीसी समन्वयक अनिरुद्ध कुलकर्णी यांनी सांगितले की, एमजीएम रुग्णालयातील १६ वर्षीय ब्रेनडेड मुलाचे स्वादुपिंड ज्युपिटर रुग्णालयात देण्यात आले. ३३ वर्षीय तरुणीवर हे स्वादुपिंड प्रत्यारोपित करण्यात आले आहे. मुंबईतील हे पहिलंच स्वादुपिंड प्रत्यारोपण आहे.
२२ मे, २०१९ रोजी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात ४७ वर्षीय ब्रेनडेड महिलेचेही अवयवदान करण्यात आले आहे. ठाण्यातील ४७ वर्षीय महिलेचे ब्रेन हॅमरेज झाले होते. त्यांना ब्रेनडेड घोषित केल्यानंतर कुटुंबाच्या परवानगीनुसार या महिलेचे अवयवदान करण्यात आले. यकृत एचएन रुग्णालयात, फुफ्फुस चेन्नई अपोलो रुग्णालयात तर दोन्ही किडनी ग्लोबल रुग्णालयात पाठवण्यात आल्या. याशिवाय त्वचा आणि डोळेदेखील दान करण्यात आले. या महिलेच्या अवयवदानामुळे देखील अनेक रूग्णांना दिलासा मिळाला आहे.