आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आई होण्याचा अनुभव महिलांसाठी खूपच सुखद असतो. मात्र, पहिल्या बाळंतपणात आणि त्यानंतर महिलांना काही अडचणींना सामोरे जावे लागते. या काळात आईकडून छोट्या-छोट्या चुका होत असतात. या चूका टाळल्या तर मातृत्वाचा हा अनुभव सुखद ठरू शकतो
पूर्ववत होण्याची घाई
बाळ जन्माला आल्यानंतर महिलांना आपल्या पूर्वीच्या आयुष्यात परतण्याची घाई झालेली असते. अशी घाई कधी करू नये. कारण बाळाला जन्म दिल्यानंतर आईच्या शरीराला पूर्वीसारखे होण्यास थोडा वेळ लागतो. यासाठी स्वत:ला वेळ दिला पाहिजे.
या चूका करू नका
* बाळाच्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्यास अनेक महिला कचरतात. परंतु, बाळाच्या संगोपनाचा कोणताही प्रश्न निरर्थक नसतो. मनात निर्माण होणारा प्रत्येक प्रश्न डॉक्टर, घरातील ज्येष्ठ व्यक्तींना विनासंकोच विचारा.
* बाळाची नखे ते जागे असताना कधीही कापू नका. यामुळे बाळ आणि आईला त्रास होतो. बाळ जागे असताना त्याचे हात जास्त हलत असतात. म्हणून बाळ झोपलेले असताना त्याची नखे काढावीत.
* पतीला कधीही बाळापासून जास्त दूर ठेवू नका. कितीही कामाचा ताण असला तरी बाळाला वेळ दिला पाहिजे. अन्यथा बाळ आणि वडीलांचे नाते लवकर दृढ होणार नाही. वडिलांनादेखील आईएवढीच बाळाची जबाबदारी द्यावी.