#YogaDay2019 : मनशांतीसाठी योगासन हा सर्वात चांगला पर्याय
आरोग्यनामा ऑनलाइन टीम : बाजारात प्रत्येक गोष्ट विकत मिळते. पण, आरोग्य आणि मनशांती तुम्हाला कोणत्याच बाजारात मिळणार नाही. परंतु, योगाची प्राचीन परंपरा असलेल्या भारतात योगासानाद्वारे या दोन्ही गोष्टी सहज मिळू शकतात. त्यासाठी नियमित योगाभ्यास करण्याची गरज आहे.
बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वांनाच कामाचा ताण जाणवतो. हा ताण सतत राहिला तर माणस संतापी होतो. स्वभावात चिडचिडेपणा येतो. यासाठी मनशांती आवश्यक आहे. योगशास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्यास मनशांती मिळू शकते. यासाठी दररोज योगाभ्यास करावा. दररोज सकाळी एखाद्या शांत ठिकाणी, खुल्या हवेत आसन टाकून पद्मासनात बसावे.
आता हात आणि बोटांनी ज्ञानमुद्रेच्या स्थितीत बसावे. पाठ, मान आणि डोके सरळ ठेवावेत. मान सैल करावी. नंतर मान पुढे मागे करावी. डोके घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने पाच पाच वेळा फिरवावेत. मान डावीकडे आणि उजवीकडे फिरवावी. लक्षात ठेवा हे करताना कुठेही हिसका देऊ नये. शांतपणे, संथपणे हा योगाभ्यास करावा. हा कालावधी हळूहळू वाढवा. काही दिवसांनी मनावरील ताण निघून जाईल आणि मनशांती मिळेल.