वेळेवर औषधे न देणाऱ्या पुरवठादारांवर मेस्मातंर्गत कारवाई करा

medicine

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मुंबई महापालिका रुग्णालयांत वेळेवर औषधे उपलब्ध न झाल्याने अनेकदा रूग्णांची स्थिती अनेकदा गंभीर होते. सध्या मुंबई महापालिकेच्या प्रमख रूग्णालयांसह सर्वच रूग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे वेळेवर औषधांचा पुरवठा न करणाऱ्या पुरवठादारांवर मेस्माअंतर्गत कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. महापालिका प्रशासनानेही या मागणीची गंभीर दखल घेतल्याचे दिसत असल्याने औषधे वेळेवर न पुरवणाऱ्या पुरवठादारांवर लवकरच अशाप्रकारची कारवाई होऊ शकते. औषधांचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांसह इतर १६ उपनगरीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

महापालिका रुग्णालयात औषधांचा पुरवठा अचानक बंद करण्यात आल्याने मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी औषध पुरवठादारांवर कारवाईची मागणी केली होती. या मुद्द्याला पाठिंबा देताना राजुल पटेल यांनी पालिका रुग्णालयात औषध पोहोचवण्यास विलंब लावणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारने मेस्मा लावला, अशी मागणी केली आहे. औषध ही गरज आहे पण वेळेवर औषध न दिल्याप्रकरणी पालिका प्रशासनाने काही पुरवठादारांवर कारवाई करत काळ्या यादीत टाकले होते. यासंदर्भात वितरकांच्या संघटनेने पालिकेला वेठीस धरण्यासाठी पालिका रुग्णालयात औषध पुरवठा करणार नसल्याचं सांगितले. त्यामुळे कंत्राटदारांव्यतिरिक्त पालिकेने थेट कंपन्यांशी व्यवहार केला पाहिजे. तसेच औषध पुरवठा करण्यास विलंब लावणाऱ्या पुरवठादारांवर राज्य सरकारने मेस्मा कायदा लावून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीला स्थायी समिती अध्यक्षांनी सकारात्मकता दर्शवली आहे, असे नगरसेवक राजुल पटेल यांनी सांगितले.

दरम्यान, पुरवठादारांनी औषधांच्या तुटवड्याबाबत वेगळेच कारण सांगितले आहे. पालिकेकडे आमचे पैसे थकले आहेत. बाजू मांडायला गेलो तर काही वितरकांची चूक नसताना त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय आम्ही कोणत्या परिस्थितीत घेतला याचा विचार केला जावा. आमच्यावर अन्याय झाला असून कोणताही मार्ग नव्हता. पण तरीही कारवाई होणार असेल तर यावर आम्ही काहीही बोलणार नाही, असे ऑल फूड अँण्ड डड्ढग्ज लायन्सेस होल्डर फाऊंडेशन अध्यक्ष अभय पांडे यांनी स्पष्ट केले आहे.