मुंबई : आरोग्यनामा ऑनलाइन – डॉ. पायल ताडवी या मुंबईतील नायर रूग्णालयात डॉक्टरने वरिष्ठ डॉक्टरांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी निवासी डॉक्टरांच्या संघटनेतून तीन वरिष्ठ डॉक्टरांचे मार्ड संघटनेतून तात्पुरते निलंबन करण्यात आले आहे. प्रसूतीविभागातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी डॉ. पायल यांचा छळ केल्याचा आरोप कुटुंबीयींकडून केला आहे.
त्यामुळे पुढील नोटीस येईपर्यंत नायर रूग्णालयातील मार्ड संघटनेने या तिन्ही डॉक्टरांना महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टरांच्या संघटनेतून तात्पुरते निलंबित केले असल्याचे सेंट्रल मार्डच्या अध्यक्ष आणि नायर रूग्णालयातील डॉ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले.
डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर निवासी डॉक्टरांच्या संघटनेने प्रसिद्ध पत्रक जारी केले असून या पत्रात डॉ. पायल यांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारीनंतर देखील प्रसूतीविभाग प्रमुख डॉ. चिंगलींग यांनी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने त्यांचेही निलंबन करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर नायर रूग्णालयातील डॉक्टरांनी डॉ. पायल यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी नायर रूग्णालयातील निवासी डॉक्टरांसह इतर कर्मचारी आणि डॉक्टरांनी देखील श्रद्धांजली वाहिली. या श्रद्धांजली कार्यक्रमास सुमारे ४५० कर्मचारी उपस्थित होते. नायर रूग्णालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षातील डॉ. पायल या गायनॅकोलॉजी विभागात शिक्षण घेत होत्या. त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांच्या जाचाला कंटाळून त्यांच्या हॉस्टेल रूममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही वरिष्ठ डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. पायल यांना नायर रूग्णालयातील डॉक्टरांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या आत्महत्येनंतर मार्ड संघटनेने रूग्णालयाच्या अधिष्ठात्यांशी भेट घेऊन आत्महत्येसारखे प्रकार कशा पद्धतीने थांबवू शकतो यावर चर्चा केली.