मार्डचा उपक्रम : परीक्षार्थी डॉक्टरांना पोटभर नाश्ता
मुंबई : आरोग्यनामा ऑनलाइन – बुधवारपासून मेडिकल पोस्ट गॅज्युएट विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. या विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपाशीपोटी जाऊ नये, यासाठी मार्डने केईएम रुग्णालयात या विद्यार्थ्यांसाठी पोटभर नाश्त्याची व्यवस्था केली आहे. वेळेचा अभाव तसेच परीक्षेचा तणाव यामुळे विद्यार्थी न खाता-पिता परीक्षेला जातात. वैद्यकीय विद्यार्थीदेखील यास अपवाद नसल्याने मार्डने हा उपक्रम राबवला आहे.
मुंबईत वैद्यकीय शिक्षणासाठी अन्य राज्यातून मोठ्याप्रमाणात विद्यार्थी येत असतात. हे प्रशिक्षित डॉक्टर रुग्णालयाच्या आवारातील निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहात राहतात. याठिकाणी त्यांची काळजी घेणारे कुणीही नसल्याने परीक्षेच्या कालावधीत विद्याथ्र्यांनी उपाशीपोटी राहू नये यासाठी मार्डने यासाठी पुढाकार घेतला आहे. परीक्षेला जाण्याआधी या प्रशिक्षित निवासी डॉक्टरांना सकाळचा नाश्ता त्यांच्या खोलीवरच पाठवण्यात येत आहे. तसेच मार्डचे डॉक्टर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभे राहून परीक्षेला जाणाऱ्या विद्याथ्र्यांना खाल्ल्याशिवाय बाहेर सोडत नाहीत.
पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यांची अंतिम परीक्षा सुरू झाली आहे. परीक्षेच्या काळात मनात भीती आणि अभ्यासाचा तणाव असल्याने विद्याथ्र्यांना काही न खाताच परीक्षेला जातात. पोटात काहीच नसल्याने अनेक विद्याथ्र्यांना चक्कर, उलट्या, मळमळ होते. यासाठी विद्यार्थ्यांना नाश्ता देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नाश्त्यामध्ये विद्यार्थ्यांना सँडविच, पराठे, थंडपेय, वेफर्स आणि पाण्याची बाटली देण्यात आली आहे. सध्या तरी केईएम रूग्णालयात हे सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर अन्य रुग्णालयात हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयात सुमारे २५० विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा देत आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील पालिकेच्या नायर, शीव, कूपर आणि जे. जे. रुग्णालयातील अंदाजित एक हजारांहून अधिक मुले परीक्षा देणार आहेत. उन्हाळ्याच्या काळात या विद्यार्थ्यांना न खाल्ल्याने त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे केईएम रुग्णालयातील मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनीष कुमार यांनी सांगितले.