आरोग्यनामा ऑनलाईन टीम – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी एसईबीसी आणि आर्थिक कमकुवत घटकांना आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्याची मागणी केली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वतीने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना विनंतीपत्र दिले. या विनंती पत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शाखेच्या ८१३ तर पदवी शाखांमध्ये १,७४० जागा वाढवून देण्याची मागणी आहे. या मागणीवर सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करण्याचे आश्वासन डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढून मराठा विद्यार्थ्यांना १६ टक्के जागा मंजूर केल्या. या अध्यादेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नागपूरमधील खुल्या प्रवर्गातील ३ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली.
कोर्टाने राज्य सरकार आणि राज्याचे महाधिवक्ता यांना १० जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत. तर खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांच्या १० टक्के आरक्षणावर गुरुवारी ३० मे रोजी सर्वोच्च न्यायालाने स्थगिती आणली होती. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते. महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर विद्याथ्र्यांच्या याचिकेवर ४ जून, २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात समुपदेशानाची प्रक्रिया १७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला दिले आहेत.