आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लिंबात अनेक औषधी गुणधर्म असल्याने लिंबाचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. अनेक आजारात घरच्या घरी लिंबाचे उपाय केले जातात. लिंबाच्या औषधी गुणधर्मामुळे रस किंवा लिंबूपाण्याचे नियमितपणे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. दिवसाची सुरुवात लिंबूपाणी घेऊन करावी. यामुळे त्वचा खुलून दिसते, पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अनेक इतर समस्यांपासून सुटका होते, असे सल्ला तज्ज्ञ देतात. लिंबू हे त्वचेशी संबंधित समस्या दूर करणारे नैसर्गिक अँँटीसेप्टीक औषध आहे.
यामध्ये क जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात असते. त्वचा तजेलदार ठेवण्यात याची महत्त्वाची भूमिका असते. तसेच वाढत्या वयातील परिणाम रोखण्यातही लिंबू फायदेशीर आहे.थोडक्यात तारूण्य टीकवण्यासाठी लिंबू खूप महत्वाचे आहे. त्यामुळे लिंबू आहारात ठेवलेच पाहिजे. पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन केल्यास आराम मिळतो. यामुळे मळमळणे, छातीत जळजळ होणे आणि मलावरोध यासारख्या समस्या दूर होतात. तज्ज्ञांच्या मते, यकृतासाठी लिंबू टॉनिकचे काम करतो.
लिंबू दातांसाठी खूप फायदेशीर आहे. दात निरोगी ठेवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे, यामुळे फायदा होतो. दात दुखत असल्यास लिंबाचा रस लावल्याने आराम मिळतो.
तसेच लिंबाच्या रसाने हिरड्यांची हलकी मालिश केल्याने हिरड्यातून रक्त निघणे थांबते, असे तज्ज्ञ सांगतात.लिंबू उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयोगी आहे. हृदयरोग्यांसाठी लिंबूपाणी रामबाण औषध आहे. यामध्ये भरपूर पोटॅशियम असल्याने उच्च रक्तदाब,मळमळ आणि भीती तसेच मानसिक तणावही दूर होतो. तसेच गळ्याचा संसर्ग दूर करण्यासाठी लिंबू गुणकारी आहे. गळ्याशी संबंधित समस्या किंवा टॉन्सिल्सची समस्या असल्यास लिंबामुळे खूप फायदा होतो. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्या. यामुळे आराम पडतो. वजन कमी करण्यासाठीही लिंबाचा वापर करता येतो. लिंबूपाण्याचे सेवन केल्याने वजन कमी केले जाऊ शकते. कोमट पाण्यात लिंबाच्या रसासोबत मध मिसळून त्याचे सेवन करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहते.