आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फैजान नावाच्या मुलाच्या डाव्या हाताचे हाड मोडले होते. त्यास पटना येथील दरभंगा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याच्या हाताला प्लॅस्टर केले. मात्र, या मुलाचा डावा हात मोडला असताना त्याच्या उजव्या हाताला प्लास्टर बांधल्याची घटना घडली आहे. या घटनेची दखल आरोग्यमंत्र्यांनी घेतली असून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर हॉस्पीटलचे मेडिकल सुपरीटेंडंट डॉ. राज रंजन प्रसाद यांनी सारवासारव करताना म्हटले की, आरोग्य मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा मी निषेध करतो. आणि व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. घटनेतील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे प्रसाद यांनी म्हटले आहे. दरम्यान, या मुलाच्या आईन हॉस्पिटल प्रशासनावर आणखी गंभीर आरोप केले आहे. हात मोडलेला असतानाही मुलाला एक गोळीदेखील देण्यात आली नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी मुलाच्या आईने केली आहे.
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील बीना परिसरात सरकारी हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांनी एका ७२ वर्षीय व्यक्तीला मृत घोषित केले होते. दुसऱ्या दिवशी शवागारमध्ये हा व्यक्ती जिवंत आढळला. परंतु, त्याचा काही वेळानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या मृत व्यक्तीचे नाव किशन सोनी होते. १४ जूनला त्यांना बीनाच्या सरकारी हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. २० जूनला रात्री ९ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून पोलिसांना याची सूचना दिली होती. याप्रकरणीही चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.