‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हसणे हे अनेक रोगांवर रामबाण औषध आहे. कामाच्या व्यापातून आनंदासाठी दोन क्षण काढणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. नियमित हसणे स्वभाव आणि आरोग्य दोन्हीसाठी लाभदायक ठरते. मोकळेपणाने हसल्याने शरीरात एंडोर्फिस हार्मोन सक्रिय होऊन खाण्याची इच्छा नियंत्रणात राहते. मूड खराब झाल्यावर जास्त गोड किंवा चटपटीत खाण्याची तीव्र इच्छा होते.

नवे मित्र तयार करा

जे लोक मिळून मिसळून राहतात ते तीस टक्के जास्त हसतात. यासाठी सदैव मित्रांसोबत राहिले पाहिजे. नवे मित्र तयार केल्याने त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवता येतो. वजन वाढण्यासाठी जास्त खाणे आणि तणाव या गोष्टी जबाबदार असतात. आनंदी आणि हसमुख राहिल्याने तणाव वाढत नाही, शिवाय चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही. यामुळे वजन नियंत्रणात राहते. एका संशोधनानुसार १० मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी हृदयगती तीव्र होते. तेवढ्या हृदयगतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे आहे.

तणावातही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा

हसत राहिल्याने शरीरातील ऊर्जेच्या स्तरावर चांगला परिणाम होतो. या ऊर्जेमुळे काम किंवा वाचनावर लक्ष केंद्रित करता येते. तसेच या पद्धतीने कामाची गुणवत्तासुद्धा वाढते. हसमुख राहिल्याने मनात चांगले विचार येतात आणि वागणे सकारात्मक होते. हास्यामुळे इतरांशी संबंध अधिक वृद्धिंगत होतात. हसमुख आणि नेहमी उत्साही व्यक्तीकडे लोक आकर्षित होतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे. हसल्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स कार्टिसोल नियंत्रणात असतो. परिस्थिती कितीही तणावपूर्ण असली तरी आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. यामुळे डोपामाइन आणि ग्रोथ हार्मोन्सची सक्रियता वाढते.

कॉमेडी शो पहा, शुगर नियंत्रित ठेवा

हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिस हा फीलगुड करणारा घटक क्रियाशील झाल्याने विविध भागात होत असलेले दुखणे कमी होते. हा रासायनिक घटक पेन किलरप्रमाणे काम करतो. चेहऱ्यावरील स्नायू सक्षम करणे आणि रक्तसंचार वाढवण्यासाठी हसणे उपयोगी आहे. यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतपणा वाढतो. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जेवण केल्यानंतर कॉमेडी शो पाहिल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहते, असे एका संशोधनात आढळून आले आहे. तसेच आनंदी राहिल्याने शरीराची प्रतिकार क्षमता आणि संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते. तसेच विविध प्रकारचे संसर्ग आणि अ‍ॅलर्जी होत नाही.