धक्कादायक ! भारतात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सेसची कमतरता

धक्कादायक ! भारतात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सेसची कमतरता

आरोग्यनामा ऑनलाइन – देशात ‘आयुष्यमान भारत’चा उदोउदो सुरू असताना दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रातील एक धक्कादाय वास्तव उघड झाल्याने भारतातील नागरिकांचे आरोग्य किती सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतात ६ लाख डॉक्टर आणि २० लाख नर्सेसची कमतरता असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच योग्य प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरताही वैद्यकीय क्षेत्राला भेडसावत आहे. आरोग्य क्षेत्रासाठी अपुरी तरतूद, महागडी औषधे यामुळे भारतातील गरिबी वाढते, अशी माहिती अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज डायनामिक इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) या संस्थेने दिली आहे.

सीडीईपीच्या या अहवालात भारतातील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव मांडण्यात आले आहे. यामध्ये नमूद केले आहे की, भारतातील ६५ टक्के आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नाहीत. आरोग्य सेवांचा खर्च जास्त असल्याने दरवर्षी ५ कोटी ७० लाख लोक दारिद्र्यरेषेखाली जातात. औषधांअभावी जगभरात दरवर्षी ५ कोटी ७ लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील बहुतांश मृत्यू हे मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात.

तसेच भारतातील आरोग्य क्षेत्रातील बहुतांश कर्मचारी वर्ग प्रशिक्षित नाही. भारतात डॉक्टरांचे खुपच कमी आहे. येथे दर १०,१८९ व्यक्तींमागे केवळ एक डॉक्टर उपलब्ध असून जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार दर १००० व्यक्तींमागे १ डॉक्टर असणे गरजेचे आहे. सध्या भारतात ६ लाख डॉक्टरांची कमतरता आहे. तसेच दर ४८३ व्यक्तींमागे एक नर्स उपलब्ध आहे. म्हणजेच तब्बल २० लाख नर्सेसची कमतरता भारतात जाणवत आहे. युगांडा, भारत, जर्मनीमधील आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन सीडीडीईपीच्या संशोधकांनी हा अहवाल तयार केला.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु