आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पुरुष महिलांच्या तुलनेत अधिक मद्यसेवन करतात. मात्र, हे सत्य असले तरी पूर्वीपेक्षा यातील महिलांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. तसेच मद्यसेवनाचा सर्वात जास्त वाईट परिणाम महिलांवर दिसून येतो. अमेरिकेसारख्या देशात मद्यसेवनामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेत 2000 ते 2015 दरम्यान 45 ते 64 वयाच्या महिलांचा सिरोसिसने मृत्यू होण्याचे प्रमाण 57 टक्क्यांनी वाढले आहे. महत्वाचे म्हणजे महिलांवर मद्याचा प्रभाव पुरुषांच्या तुलनेत वेगळा होतो.
ही आहेत कारणे
1 महिलांच्या शरीरातून अल्कोहोल डिहायड्रोगेनेज एंजाइम फार कमी प्रमाणात निघते, हे लिव्हरमधून निघत असते आणि शरीरातील अल्कोहोल नष्ट करते. यामुळे महिलांवर मद्याचा जास्त दुष्परिणाम होतात.
2 शरीरातील फॅट अल्कोहोल राखून ठेवतात. शरीरातील पाणी त्याच्या प्रभावाला कमी करते. अशात नैसर्गिकरित्या शरीरात जास्त फॅट आणि कमी पाणी यामुळे महिलांवर अल्कोहोलचा वेगळा प्रभाव दिसतो.
3 महिलांवर मद्याचा प्रभाव वेगळा होत असल्यानेच मद्य सेवन करत असलेल्या महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त समस्या दिसून येतात, असे हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमधील मानसोपचार तज्ज्ञ डॉन सुगरमॅन यांनी म्हटले आहे.
4 ज्या महिला जास्त मद्यसेवन करतात त्यांच्यात पुरुषांच्या तुलनेत मद्याची सवय आणि आरोग्यासंबंधी समस्या जास्त निर्माण होतात. याला टेलीस्कोपिंग असे म्हणतात.
5 महिला पुरुषांच्या तुलनेत उशीरा मद्यसेवन करण्यास सुरुवात करतात. पण लवकरच त्या मद्यसेवनाच्या आहारी जातात.
6 महिलांना यामुळे लिव्हर आणि हृदयासंबंधी रोग होण्याची शक्यता अधिक असते.