आरोग्यानामा ऑनलाइन टीम – धकाधकाच्या जीवनशैलीमुळे कामाचा आणि अन्य गोष्टींचा ताण घेऊनच माणसे जगत असतात. त्यातच अशा ताणतणावामुळे रागावर कधीकधी नियंत्रण राहत नाही. शिवाय, मनात भरपूर राग असतो, तो बाहेर पडत नसल्याने सतत अस्वस्थता जाणवत असते. अशावेळी मनाचा सतत कोंडमारा होऊन मानसिक स्थिती बिघडू शकते. मात्र, या समस्येतून तुमची सुटका सहज होऊ शकते. यासाठी किकबॉक्सिंग हा खेळ खेळावा. किकबॉक्सिंग हा खेळ एरोबिक आणि मस्क्युलर व्यायामासारखाच असून यामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहू शकते. या खेळाच्या हालचाली शरीरासाठी कशा फायदेशीर आहेत, याची माहिती आपण घेणार आहोत. किकबॉक्सिंगमुळे वजन कमी करता येऊ शकते तसेच उष्मांक जाळता येतो. शिवाय स्नायूही बळकट होतात. शरीराचा उष्मांक जाळण्याची क्षमता या खेळाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. साधारणत: सरासरी वेगापेक्षा एक तास या खेळाचा सराव केल्याने दोनशे ते तीनशे उष्मांक जाळता येऊ शकतात.
तसेच किकबॉक्सिंग तणाव घालवण्याचे चांगले तंत्र आहे. या खेळाचा सराव केल्यास एंडोर्फिंस हार्मोन कार्यरत होतो. हा एक प्रकारचा फील गुड हार्मोन आहे. यामुळे तणाव आणि वेदनांतून सुटका होते, असे तज्ज्ञ सांगतात. किकबॉक्सिंगमुळे बॉडी पॉश्चर म्हणजे शरीराची लकब सुधारते. कंबर आणि पोटातील चरबीपासूनही सुटका होते. शिवाय स्नायू आणि सांध्यांची गतिशीलताही वाढते. किकबॉक्सिंगमुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते. या खेळाच्या हालचालींनी हृदय वेगाने रक्त शुद्ध करते. हृदयाला बळकटी मिळते. शरीराची ताकद वाढते आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो. किकबॉक्सिंग हृदयासोबतच श्वसन क्रियेसाठीही लाभदायक आहे. किकबॉक्सिंग करण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे वॉर्म-अप करावे. त्यासाठी स्ट्रेचिंग किंवा जंपिंग जॅक्स आणि पुश-अप करावेत. किकबॉक्सिंग केल्यानंतर पाच ते दहा मिनिटे आराम करावा. त्यासाठी स्ट्रेचिंग करावे. हळू चालणे किंवा धावणे असे व्यायाम प्रकार करावेत. यामुळे स्नायूंना आराम मिळतो. आणि स्नायूंना इजा होण्याचा धोकाही कमी होतो.
मात्र, किकबॉक्सिंग पहिल्यांदा करणारांनी आधी ते शारीरिकरीत्या किकबॉक्सिंग करण्यासाठी सक्षम आहेत का, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पहिल्यांदा खेळणाराचा रक्तदाब आणि हृदयगती तपासल्यानंतरच त्यांना परवानगी द्यावी. जोपर्यंत किकबॉक्सिंगचे तंत्र अवगत होत नाही तोपर्यंत सराव करत राहावा. प्रशिक्षण वर्गास जाण्यापूर्वी, वर्ग सुरू असताना आणि शेवटी भरपूर पाणी प्यावे. दमा, मधुमेह किंवा अधिक वजन असलेल्या व्यक्तीने किकबॉक्सिंग खेळू नये. किकबॉक्सिंग हा मार्शल आर्ट प्रकारातील खेळ असून त्यात बॉक्सिंगसह किकचाही वापर होतो. यामध्ये शरीराचा वरचा आणि खालचा भाग सारखाच सक्रिय राहतो. शरीराचे ८० टक्के स्नायू या खेळात एकाचवेळी काम करतात. किकबॉक्सिंग हाय-इंपॅक्ट व्यायाम आहे. त्यामुळे ज्यांनी आधी कोणताच व्यायाम केला नसेल त्यांनी पहिल्यांदा लो-इंपॅक्ट एरोबिक व्यायाम केला करावा. पहिल्यांदाच हा खेळ खेळणा-याने प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी प्रमाणित प्रशिक्षक आणि फिजियोथेरपिस्ट आहेत का, याकडे लक्ष द्यावे. हालचाल करण्यासाठी सोपे होईल यादृष्टीने कपडे घालावेत.